नवी दिल्ली वृत्तसंस्था । आज सकाळपासून मतमोजणी सुरू झालेल्या पश्चीम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले असून भाजपने प्रयत्नांची शर्थ करूनही त्यांना सत्ता संपादन करण्यात अपयश येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसह लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी आज सकाळपासून सुरू झाली असून यात पश्चीम बंगालमध्ये तृणमूल व भाजपमध्ये जोरदार लढत सुरू आहे. सध्या तृणमूलला आघाडी असली तरी जागांमध्ये तृणमूल भाजपपेक्षा पुढे असल्याचा स्पष्ट कल समोर आला आहे.
सर्वांचे लक्ष लागून असणार्या पश्चीम बंगालमध्ये मात्र प्रचंड चुरस पहायला मिळेल अशी शक्यता असली तरी तृणमुलने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. पश्चीम बंगालमध्ये तृणमूल १९३ तर भाजप ९६ जागांवर आघाडीवर असल्याचे कल दिसून आले आहे. यामुळे ममता बॅनर्जी या विजयाची हॅटट्रीक करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केरळमध्ये सत्ताधारी डावी आघाडी पुन्हा एकदा सत्तेवर येणार असल्याचे चित्र दिसून आले आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि मित्रपक्षांना आघाडी मिळाली आहे. आसाममध्ये भाजपला आघाडी मिळाली आहे.