जळगाव प्रतिनिधी । त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात “मधुमेह…समज व गैरसमज’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळे पुण्यातील डॉ. रवींद्र मते यांनी विद्यार्थ्यांना मधुमेह या विषयी मार्गदर्शन करत त्यांची आरोग्य तपासणी केली.
प्रसंगी महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी या आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेतला. मधुमेह या आजाराविषयी अनेकांमध्ये समज व गैरसमज आहे. यासाठी हा व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन मनोज पाटील, फार्मासीचे प्राचार्य हर्षल तारे, पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिनेश पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना डॉ. मते यांनी सांगितले की, मधुमेहाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असला तरी सर्वसामान्यांमध्ये मात्र त्याबाबत अजूनही अनभिज्ञता व गैरसमज आहेत. केवळ साखर खाल्ल्याने, वजन वाढल्याने व कुटुंबात एखाद्याला मधुमेह असेल तरच मधुमेहाची लागण होते, असा गैरसमज अनेकांमध्ये आहे. जीवनशैली, ताण-तणाव, व्यायामाचा अभाव व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे होत असून कोणत्याही स्वरूपाचा मधुमेह हा पूर्णपणे बरा होऊ शकत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यानंतर त्यांनी मधुमेह कशाने व कसा होतो त्याची लक्षणे कोणती याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रसंगी पोषक आहार, नियमित योगा, व्यायाम व उत्तम मानसिक स्वास्थ्य ही निरोगी आरोग्याची चतुःसूत्री असल्याचे प्राचार्य तारे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगेश चौधरी यांनी केले तर प्रा. महेश हरळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार देशमुख, डॉ. डी.जे. पाटील, सुरेश पाटील यांनी सहकार्य केले.