बोली भाषांनाही हिणवणे हा भाषिक दहशतवाद – अशोक सोनवणे

WhatsApp Image 2019 11 10 at 7.29.48 PM

चोपडा, प्रतिनिधी | बोलीभाषेतून लोकसंस्कृतीचे धन पिढ्यांपासून पिढ्यांकडे संक्रमित होत असते. बोली भाषांमधून आपल्या परंपरा आणि संस्कृतीची ओळख होत असते. बोलीभाषांना हिणवणे म्हणजे भाषिक दहशतवाद होय. यामुळे भाषा पंगू बनेल, असे प्रतिपादन कविवर्य अशोक नीलकंठ सोनवणे यांनी केले. ते ‘मराठी साहित्यातील बोलीभाषांचे योगदान’ या परिसंवादाच्या बोलत होते.

चोपडा येथील नगर वाचन मंदीर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खान्देश रत्न बहिणाबाई चौधरी जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील  डॉ. स्व. सुशिलाबेन शहा साहित्यनगरीतील डॉ. किसन भुतडा मंचावर अध्यक्षस्थानी कविवर्य अशोक सोनवणे  होते.  या परिसंवादात जळगाव येथील डॉ. मिलिंद बागूल व पुणे येथील वि. दा. पिंगळे हे सहभागी झाले होते.यावेळी परिसंवादात आपले मत व्यक्त करतांना डॉ. मिलिंद बागुल म्हणाले की, समान बोलीभाषेची दोन माणसे एकत्र आली तर त्यांनी आपल्या बोलीतच बोलावे. त्यामुळे ओळख निर्माण होते. आपल्या भाषेबद्दल न्यूनगंड असू नये. मराठी भाषा जर समुद्र असेल तर बोलीभाषा या तिच्या नद्या आहेत ज्या तिला समृद्ध करत आहे. तर वि. दा. पिंगळे यांनी अभिजनांची किंवा बहुजनांची असा भाषेमध्ये सुद्धा शुद्धता नसते. प्रत्येक भाषेला स्वतःचा संस्कार असतो, तत्वज्ञान असते. भाषा या अनुदानावर टिकत नाही तर त्यासाठी त्या समुदायाची तळमळ असावी लागते, असे सांगत बोलीभाषेचे महत्व सांगितले. याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते परिसंवादातील लोक यांचा सत्कार करण्यात आला. परिसंवादाचे आभार नगर वाचन मंदिराच्या संचालक श्रीकांत नेवे यांनी तर सूत्रसंचालन संजय बारी यांनी केले.

Protected Content