Home क्रीडा राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांना अभिवादन; जळगावात हॉकी-फुटबॉल खेळाडूंचा गौरव

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांना अभिवादन; जळगावात हॉकी-फुटबॉल खेळाडूंचा गौरव

0
5


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जळगाव हॉकी व फुटबॉल संघटनेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारताचे महान हॉकीपटू आणि ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. तसेच विद्यापीठ व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसह हॉकीपटूंचा पुष्पगुच्छ व क्रीडा साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राध्यापिका डॉ. अनिता कोल्हे यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपस्थितांना क्रीडा शपथ देण्यात आली. क्रीडा संचालिका हिमाली बोरोले यांनी शपथ दिल्यानंतर हॉकी व फुटबॉल खेळाडू तसेच मुला-मुलींनी उत्स्फूर्तपणे शपथ घेतली.

यावेळी डॉ. अनिता कोल्हे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत भारतीय हॉकीला त्यांनी मिळवून दिलेल्या जागतिक ओळखीची माहिती दिली. आपल्या अद्वितीय कौशल्याच्या जोरावर मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव मिळवून दिला. त्यांचे समर्पण, खेळाप्रती असलेली निष्ठा आणि देशासाठी खेळण्याची भावना आजच्या पिढीतील खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख यांच्या हस्ते विद्यापीठ व राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूंचा पुष्पगुच्छ आणि क्रीडा साहित्य देऊन गौरव करण्यात आला. यासोबतच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हॉकी खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. या सन्मानामुळे खेळाडूंना आगामी स्पर्धांमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.

फुटबॉल प्रशिक्षक वसीम रियाज यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना मेजर ध्यानचंद यांच्या व्यक्तिमत्त्वातील शिस्त, कठोर मेहनत, समर्पण आणि राष्ट्रप्रेम या गुणांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. मेजर ध्यानचंद हे हॉकीचे जादूगार म्हणून जगभर प्रसिद्ध असले तरी त्यांच्या जीवनातील मूल्ये केवळ हॉकीपुरती मर्यादित नसून प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी आहेत. फुटबॉलपटूंनीही त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपल्या खेळात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करण्याचे ध्येय ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला चोपडा येथील सुरमाझ फाउंडेशनचे अबुलैस शेख, अॅड. असीम शेख यांच्यासह हॉकी आणि फुटबॉल खेळातील अनेक मुले व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये झकी शेख, अली खान, अबुझर शेख, ओवैस खाटीक, शहजाद खान, अमर शेख, नेहाल शेख, अनस शेख, रेहान खान, नम्रता बाविस्कर, निकिता बारी, देवयानी सोनवणे, पुनम सोनवणे आणि कृष्णाली चांडेलकर यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या शेवटी क्रीडा संचालिका छाया चिरमाडे यांनी उपस्थित मान्यवर, प्रशिक्षक, खेळाडू आणि कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून खेळाडूंमध्ये क्रीडाभावना, शिस्त, मेहनत, समर्पण आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

 


Protected Content

Play sound