फैजपूर, प्रतिनिधी | पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आवारात उद्यापासून (दि.२९) आदिवासी तडवी भिल्ल समाजातर्फे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येणार आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून आदिवासी तडवी भिल्ल समाजाला जातवैधता प्रमाणपत्र देण्यात नंदुरबार समिती मज्जाव करीत आहे, तडवी भिल्ल समाज संघटनेच्या वतीने वारंवार नंदुरबार समिती व पुणे टीआरटीआयला निवेदनाद्वारे पत्रव्यवहार करून ही समाजावर अन्याय होत आहे व खऱ्या आदिवासी तडवी भिल्ल जमातीला न्याय-हक्कापासून मुद्दाम डावलण्याचा प्रयत्न होत आहे. त्याविरोधात आदिवासी तडवी भिल्ल समाज उद्यापासून (दि.२९) पुणे येथे आमरण उपोषणाच्या ठिकाणी खालील मागण्या मांडणार आहे. दि.०६/०९/ १९५० रोजी अनु.जमातीची पहिली यादी राष्ट्रपतींनी प्रसिद्ध केलेल्या यादीनुसारच “तडवी-भिल्ल” जमातीला अ.क्र. ८ नुसारच जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, त्यांना त्वरीत जातवैधता प्रमाणपत्र मिळावे व विनाअट प्रवेश मिळावा, तडवी भिल्ल जमातीची शैक्षणिक व नौकरी संदर्भातील प्रमाणपत्रे रद्द करण्यात आलेली आहेत, त्या प्रकरणांची तत्काळ सुनावणी करून लवकरात लवकर न्याय द्यावा. विहीत मुदतीत वैधता प्रमाणपत्र पारीत करण्यात यावे, विविध प्रकरणांत नंदुरबार समितीला न्यायालयाने दंड ठोठावला आहे व उपाध्यक्षांवर गुन्हा नोंद झालेला आहे. त्याची तत्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, जळगाव जिल्ह्यातील तडवी भिल्ल जमातीत शासन अध्यादेशानुसार फार्म बी नुसारच जात प्रमाणपत्र देण्यात यावे. जोपर्यंत आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत तडवी भिल्ल समाज पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आवारात आमरण उपोषण करतील, असा निर्धार करण्यात आला आहे. आदिवासी तडवी भिल्ल समाज बांधवांनी पुणे उपोषणस्थळी पोहचून उपोषणाच्या ठिकाणी आपले न्याय हक्कासाठी न्यायीक लढ्यात सामील व्हावे, असे आवाहन आदिवासी तडवी भिल्ल समाजातर्फे करण्यात आले आहे
.