
जळगाव (प्रतिनिधी) भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने घेतलेल्या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेच्या (केव्हीपीवाय) परीक्षेत द्वितीयस्तर परिक्षा उत्तीर्ण होत जळगावच्या आकाश ओम त्रिवेदी या विद्यार्थ्याने देशात 162 वा क्रमांक पटकावला आहे. आकाशला भारत सरकारकडून शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.
जळगाव शहरातील काशिनाथ पलोड शाळेतील माजी विद्यार्थी आकाश ओम त्रिवेदी याने भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून घेण्यात आलेल्या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेत सहभाग घेतला होता. योजनेतील द्वितीयस्तरावरील परीक्षा उत्तीर्ण होत त्याने देशात 162 वा क्रमांक पटकावला. त्यामुळे त्याला केंद्र सरकारकडून दरमहा 5 हजार रूपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. आकाश त्रिवेदी याने यापूर्वी देखील नॅशनल टॅलेंट सर्च परिक्षेत उत्तम यश संपादित करून शिष्यवृत्ती प्राप्त केली होती. एरंडोल येथील अॅड.ओम त्रिवेदी व रेखा त्रिवेदी यांचा तो मुलगा आहे. आकाशच्या यशाने जळगावचे नाव पुन्हा देशात झळकले आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आकाश सध्या कोटा येथे आयआयटीची तयारी करीत आहे.