Home धर्म-समाज सावद्याच्या सर्चलाईट स्कूलमध्ये आदिवासी दिन उत्साहात, बिरसा मुंडा यांना आदरांजली

सावद्याच्या सर्चलाईट स्कूलमध्ये आदिवासी दिन उत्साहात, बिरसा मुंडा यांना आदरांजली


सावदा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी येथील सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूल, वढोदे येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी लोकांच्या हक्कांचे रक्षण आणि त्यांच्या योगदानाला मान्यता देण्यासाठी साजरा होणाऱ्या या दिनाची सुरुवात आदिवासी शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

कार्यक्रमासाठी सम्राट फाउंडेशनचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे, शाळेच्या चेअरमन अश्विनी तायडे, मुख्याध्यापक नितीन झाल्टे आणि पर्यवेक्षक पंकज बोदडे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
या वर्षीच्या ‘पारंपरिक ज्ञानाचे जतन आणि प्रसार करण्यात आदिवासी महिलांची भूमिका’ या थीमनुसार शाळेच्या फलकावर बैलगाडी, नांगर, इरली आणि घोंगडे यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. गेल्या आठवडाभरापासून विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, पोशाख, आहार आणि सण-उत्सव यांबद्दल माहिती घेतली.

यावेळी बोलताना अनोमदर्शी तायडे यांनी आदिवासी समाजाच्या योगदानावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “आदिवासी समाज निसर्गाशी घट्ट जोडलेला आहे. देशातील जंगल संवर्धन, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि आयुर्वेद परंपरेचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य हा समाज करतो. मात्र, आजही या समाजाचा विकास अपेक्षित पातळीवर झालेला नाही. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने (UNO) ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला आहे.”

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी पोशाख परिधान करून लोकगीते सादर केली. ‘जय आदिवासी, बिरसा मुंडा की जय’ या घोषणांनी संपूर्ण शाळेचा परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज भालेराव यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक नितीन झाल्टे यांनी केले.


Protected Content

Play sound