सातपुड्याचे वैभव जपण्यासाठी आदिवासी बांधवांचे योगदान महत्वाचे – राजेंद्र राणे

रावेर (प्रतिनिधी) रावेर व यावल तालुक्यात पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सातपुडा पर्वताची महत्वाची भूमिका असून या सातपुड्याचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांचे योगदान अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन प्र.सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र राणे यांनी कुसुंबा येथील कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलतांना केले.

वन विभागाच्या शासन निर्णयानुसार जंगलावरील भार कमी होण्यासाठी कुसुंबा येथील संयूक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत सातपुडा पर्वताच्या लगत असलेल्या गावातील नागरिकांना घरगुती गॅस संचांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्षपदी राजेंद्र राणे हे होते, तर गॅस संच वाटप तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी श्री. राणे पुढे म्हणाले की, पर्यावरण संरक्षणासाठी जल, जमीन आणि जंगल यांचे महत्त्व असून त्याचे जतन करणे आपली जबाबदारी आहे. वन विभागाच्या प्रत्येक मोहिमेत सहभागी होऊन आपण ही वनसंपत्ती टिकवली पाहिजे. वन वणवा, वृक्षतोड, वन्यजीव शिकार रोखण्यासाठी संयुक्त वन समितीच्या पदाधिकारी व सदस्य यांनी पुढाकार घेण्याचे समुपदेश यावेळी त्यांनी केले यावेळी तहसीलदार विजय कुमार ढगे यांनी शासनाच्या रोजगार हमी योजना, कृषी विषयक आलेले अनुदान आणि बँक खाते आदी माहिती देऊन शेतकऱ्यांनी आधार कार्ड आणि बँक डिटेल मदतनिधी मिळण्यासाठी तात्काळ जमा करण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे म्हणून जी.प.माजी अध्यक्ष उखर्डू तडवी, कुसुंबा खुर्द सरपंच नूरजहान तडवी, कुसुंबा बुद्रुक सरपंच सलीम तडवी, संयूक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष नूरजहान तडवी, दीपक नगरे, हुसेन तडवी, उपसरपंच सुरेश पाटील, ग्रामसेविका रुबिना तडवी, सौ.हेमलता राणे, पो.पा. रईस तडवी, मुबारक तडवी, वन हक्क समिती जुम्मा तडवी, बिसमिल्ला तडवी, गुलशेर तडवी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वनपाल अरविंद धोबी, वनपाल अतुल तायडे, वनपाल संजय भदाणे, नाकेदार यशवंत पाटील, वनरक्षक रोहिणी थोरात, अरुणा ढेपले, नीलम परदेशी, सोपान बडगणे, गणेश चौधरी यांच्यासह सर्व कर्मचारी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रदीप सपकाळे यांनी केले.

Add Comment

Protected Content