Home Cities यावल आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार दर्जेदार शिक्षण ; गटशिक्षणाधिकाऱ्यांचा निर्धार

आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार दर्जेदार शिक्षण ; गटशिक्षणाधिकाऱ्यांचा निर्धार


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदावर जळगाव येथील फिरोज पठाण यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. पदभार स्वीकारताच पठाण यांनी आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली असून, केंद्र सरकारच्या ‘निपुण भारत’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आणि आदिवासी पाड्यांवरील शाळांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे प्रतिपादन केले आहे.

निपुण भारत अभियानावर विशेष भर :
जळगाव जिल्ह्याची ‘निपुण भारत’ अभियानातील कामगिरी सध्या चिंताजनक आहे. विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढवण्यासाठी हे अभियान अत्यंत महत्त्वाचे आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, “तालुक्यातील एकही विद्यार्थी निपुण अभियानात मागे राहणार नाही, यासाठी आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म नियोजन करणार आहोत,” असे पठाण यांनी ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’शी बोलताना सांगितले.

आदिवासी भागातील शिक्षणावर लक्ष :
यावल तालुका हा भौगोलिकदृष्ट्या आदिवासी बहुल आणि दुर्गम क्षेत्र म्हणून ओळखला जातो. येथील अतिदुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. केवळ शाळा चालवणे नव्हे, तर विद्यार्थी आणि पालकांशी थेट समन्वय साधून शैक्षणिक गळती रोखण्यावर त्यांनी भर दिला आहे.

शिक्षकांना शिस्तीचा इशारा :
शाळा सुरू होण्यास अद्याप अवधी असला तरी, शिक्षकांनी आतापासूनच मानसिक तयारी करावी, असे आवाहन पठाण यांनी केले. “शिक्षण क्षेत्रात काम करताना शिस्त आणि नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. शिक्षकांनी आपल्या सेवाकार्यात नियमांच्या चाकोरीत राहून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवावे,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. विश्वनाथ धनके यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या या पदावर पठाण यांच्या नियुक्तीमुळे यावलच्या शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदलांची अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound