श्रीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | निवडणूक आयोग आज जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. यापुर्वीच पोलीस व सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांची संख्या 200 हून अधिक आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपूर्वी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे 31 जुलै रोजी आयोगाने केंद्रशासित प्रदेश प्रशासनाला गृहजिल्ह्यांमध्ये नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास सांगितले होते.
आयजीपी, डीआयजींसह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक जिल्ह्यांना नवे पोलीस प्रमुख मिळाले. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, 8 उपमहानिरीक्षक आणि 14 वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांच्यासह 33 पोलीस अधिकाऱ्यांच्या तत्काळ प्रभावाने बदल्या करण्यात आल्या आहेत.
गुरुवारी रात्री उशिरा सामान्य प्रशासन विभागाने तत्काळ प्रभावाने 89 बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये पूंछ आणि बांदीपोरा जिल्ह्यांतील उपायुक्त, सचिव, आयुक्त, महासंचालक, व्यवस्थापकीय संचालक आणि अनेक विभागांचे संचालक यांचा समावेश आहे. या बदली प्रक्रियेचा उद्देश हा आहे की कोणताही अधिकारी त्याच्या गृहजिल्ह्यात पदावर राहू नये. तसेच, त्यांनी कोणत्याही एका पदावर 2 वर्षांपेक्षा जास्त काळ घालवला नसावा.