जळगाव प्रतिनिधी | एसटीच्या संपकरी कर्मचार्यांबाबत एसटी महामंडळाने कठोर भूमिका घेत आता बदल्यांचे सत्र सुरू केले असून याच्या अंतर्गत जळगाव विभागातील १२ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
या संदर्भात वृत्त असे की, एसटी कर्मचार्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून संप सुरू केला आहे. या कर्मचार्यांना पगारवाढ लागू करूनही संप मागे घेण्यात आलेला नाही. त्यामुळे अगोदर निलंबन, सेवा समाप्ती तसेच मेस्माची कारवाईचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले होते. यालाही संपकरी दाद देत नसल्याने आता कर्मचार्यांचा संप मोडीत काढण्यासाठी बदली अस्त्राचा बडगा उगारण्यात आला आहे. जळगाव विभागात आतापर्यत ३२४ कर्मचार्यांच्या निलंबनासह ४२ जणांच्या सेवासमाप्तीचे आदेश देण्यात आले आहेत, तर नव्याने शनिवारी कार्यालयीन वेळेपूर्वी १२ चालक व वाहक कर्मचार्यांच्या जळगाव आगारासह अन्य आगारांतर्गत विभागांतून बदल्या करण्यात आल्या असल्याची माहिती जळगाव परिवहन विभाग नियंत्रक अधिकारी भगवान जगनोर यांनी दिली.
शासनाच्या आदेशानुसार जळगाव विभागात आतापर्यत ३२४ कर्मचार्यांचे निलंबन तर ४२ जणांची सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय मेस्माअंतर्गत कारवाई करण्याचे देखिल संकेत देण्यात आले होते. परंतु मेस्माच्या वापराबाबत आगामी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होणार असून तोवर या ऐवजी संपकरी कर्मचार्यांचा संप मोडीत काढण्यासाठी आता एसटी प्रशासनाने बदली अस्त्राची अंमलबजावणी केली आहे. त्यानुसार जळगाव विभागात ४४४२ वाहक, चालक, यांत्रीकी विभाग व प्रशासकिय अधिकारी कर्मचारी असे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ८६ कर्मचारी अधिकृत रजेवर असून संपात सहभागी असलेल्या ३९२० कर्मचार्यांपैकी ३२४ जणांचे निलंबन व ४२ जणांची सेवा समाप्ती करण्यात करण्यात आली आहे. यानंतर जळगाव आगारातील दोन तर यावल, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा जामनेर, रावेर, भुसावळ, पाचोरा, मुक्ताईनगर आणि एरंडोल अशा विविध आगारातील कर्मचार्यांच्या शनिवारी बदल्या करण्यात आल्या. यात ९ चालक, ३ वाहक यांचा समावेश आहे.
एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातून आदेश येताच जळगाव विभागातून संपात सहभागी असलेल्या कर्मचार्यांची यादी तयार करण्यात आली. या त्यानुसार शनिवारी दुपारपर्यंत त्यावर विभाग नियंत्रकाची तातडीने स्वाक्षरी घेऊन कर्मचार्यांना तत्काळ बदलीचे आदेश बजावण्यात आले. संपात सहभागी असलेल्यांना सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणापासून अन्यत्र लांबच्या आगारात बदली करण्यात आली आहे. जळगाव एसटी महामंडळ परिवहन विभागात प्रथमच प्रशासकिय कर्मचार्यांप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहक चालक वा अन्य कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. असे असले तरी या बदली सत्राला घाबरून आम्ही संप मागे घेणार नसल्याचे संपकरी कर्मचार्यांनी म्हटले आहे.