जळगाव जिल्ह्यातील ८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; चार नवीन अधिकारी येणार !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक परीक्षेत्रातील २८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी केल्या आहेत. एकाच जिल्ह्यात तीन किंवा त्यापेक्षा जास्त कार्यकाळ करण्यात आलेल्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील ५ अधिकार्‍यांच्या जिल्ह्याबाहेर तर तिघांच्या अकार्यकारी पदावर बदल्या करण्यात आल्या असून ४ अधिकारी जिल्ह्यात नव्याने बदलून येत आहेत.

जळगाव जिल्ह्यातून जिल्हाबाहेर या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आले आहे. यात चोपड्याचे के.के.पाटील यांची धुळे, भडगावचे राजेंद्र पाटील यांची नाशिक ग्रामीण, जळगावचे रामकृष्ण कुंभार यांची अहमदनगर, जळगावचे अरुण धनवडे यांची नाशिक ग्रामीण, पाचोरा शहराचे राहुल सोमनाथ खताळ यांची नाशिक ग्रामीण,

जळगावातील ३ अधिकार्‍यांच्या अकार्यकारी पदावर बदल्या

जळगाव एमआयडीचे जयपाल हिरे, चाळीसगाव ग्रामीणचे ज्ञानेश्वर जाधव व रामानंदच्या शिल्पा पाटील यांची जळगावातच बदली करण्यात आली असलीतरी त्यांना अकार्यकारी पदावर नियुक्ती देण्याचे आदेशात नमूद आहे. ही नेमणूक देणे शक्य नसल्यास अन्य जिल्ह्यात बदलीबाबतचा प्रस्ताव द्यावा, असेही आयजी यांनी आदेशात नमूद केले आहे.

जळगाव जिल्ह्यात हे अधिकारी येणार बदलून
अहमदनगरचे मधुकर धोंडीबा साळवे, नाशिक ग्रामीणचे संदीप पोपट रणदिवे, नाशिक ग्रामीणचे विकास सुखदेव देवरे, नाशिक ग्रामीणचे सुनील रामराव पाटील हे चौघे अधिकारी जळगाव जिल्ह्यात पोलिस निरीक्षक म्हणून बदलून येत आहेत.

धुळ्यात तीन अधिकार्‍यांनी सोडला पदभार
धुळ्यातील आझादनगरचे निरीक्षक नितीन देशमुख यांची अहमदनगरला बदली झाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक उमेश बोरसे यांच्याकडे त्यांनी पदभार सोपवला आहे. धुळे शहरचे आनंद कोकरे यांची अहमदनगरला बदली झाली असून त्यांनी सहाय्यक निरीक्षक शकील रशीद शेख यांच्याकडे पदभार सोपवला तर देवपूरचे सतीश घोटेकर यांची अहमदनगरला बदली झाली असून उपनिरीक्षक हरीश्चंद्र पाटील यांच्याकडे पदभार सोपवला आहे.

Protected Content