चिन्याला तुडवून मारले; तत्कालीन कारागृह रक्षकाचा न्यायालयात अर्ज

जळगाव प्रतिनिधी ।  येथील जिल्हा कारागृहातील मयत बंदी चिन्या उर्फ रवींद्र जगताप याला क्षुल्लक कारणावरून तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी यांच्यासह तिघांनी त्याला छातीत बेदम मारहाण करीत लाथाबुक्क्यांनी तुडविले. त्यामुळे तीन जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, याबाबतचाअर्ज तत्कालीन कारागृहरक्षक मनोज जाधव यांनी जळगावच्या प्रधान सत्र न्यायाधीशांना पाठविला आहे. 

यावेळी कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी त्यांना थांबविण्याऐवजी चिन्यांच्या तोंडावर लाथ मारत रक्षकांना चिथावणी दिली. त्यामुळे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, जितेंद्र माळी यांच्यासह तीन जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, याबाबतचा खळबळजनक अर्ज तत्कालीन कारागृहरक्षक मनोज जाधव यांनी जळगावच्या प्रधान सत्र न्यायाधीशांना १ डिसेंबर रोजी पाठविला आहे.

मनोज जाधव हे जळगाव कारागृहात रक्षक असतांना हि घटना घडली आहे. घटनेचा साक्षीदार असल्यामुळे माझ्यासह सचिन कोरके यालादेखील औरंगाबाद उपमहानिरीक्षक कार्यालयाला सांगून जळगावातून बदली करण्यास भाग पाडले आहे. मनोज जाधव हे लातूर येथे तर सचिन कोरके उस्मानाबाद येथे औरंगाबाद कार्यालयाने बदली केले आहे. जळगाव प्रधान सत्र न्यायाधीशांना लातूर जिल्हा कारागृहामार्फत मनोज जाधव यांनी अँफिडेव्हिट व प्रतींज्ञा लेख करून अर्ज पाठविला आहे.

अर्जात म्हटले आहे की, ११ सप्टेंबर २०२० रोजी जळगाव जिल्हा कारागृह येथे दिवसपाळीस मी सर्कल ड्युटी नेमणुकीस असल्याने यावेळी कारागृहात नव्याने दाखल झालेल्या न्यायाधीन बंदी चिन्या उर्फ रवींद्र जगताप हा सेपरेटमध्ये ओट्यावर उभा राहून औषध घेऊन पाणी पीत होता. त्यावेळी त्याच्या जवळून थोडे पाणी सांडले गेले. ते पाणी वरिष्ठ तुरुंगअधिकारी जितेंद्र माळी यांचे अंगावर उडाल्याने त्यांनी रागारागात त्याला जोरात बुटाची लाथ या आजारी बंदी जगताप यांच्या छातीत मारली व तो खाली पडला. माळी जेलर यांच्या समवेत तेथे उपस्थित रक्षक कर्मचारी अण्णा किसन काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत हे सर्वजण त्याच्यावर तुटून पडले व अक्षरशः त्याच्या छातीत लाथाबुक्क्यांनी प्रहार करून त्यास अर्धमेले करून टाकले. या घटनेच्या वेळी त्याठिकाणी अधीक्षक पेट्रस गायकवाड हे आले व त्या बंद्याची होणारी मारहाण थांबविण्याऐवजी स्वतः त्याच्या तोंडावर बुटाची लाथ मारली व या सर्व रक्षकांना उत्तेजन देऊन “तुम्ही घाबरू नका, माझे वर पर्यंत हात आहेत, तो मेला तरी चालेल ”  अशा प्रकारे चिथावणी देणारे वक्तव्य केल्यामुळे या नराधम झालेल्या रक्षकांनी व जेलर माळी यांनी त्याला अश्लील शिव्या देत पुन्हा बेदम मारहाण करून त्यास केसांना धरून फरफटत नेले व त्याच्या हाताला हाथकडी लावून अक्षरशः त्या सर्वांनी मिळून त्यास वेगळ्या कोठडीमध्ये फेकून दिले. व त्यानंतर थोड्याच वेळात या बंद्याचा याठिकाणी अत्यंत वाईट अशा पद्धतीने तडफडून मृत्यू झाला. मनातील कर्तव्यदक्ष कर्मचारी मानवतेच्या दृष्टिकोनातून असणारे महत्त्वाचे कर्तव्य म्हणून मी सदरचा अर्ज वस्तुस्थिती प्रतिज्ञापत्र करीत जळगाव जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडे लातुर कारागृह अधिक्षक मार्फत पाठविले आहे. असेही अर्जात नमूद आहे.

यानंतर सदर मृत बंद्याच्या शवाची याठिकाणी प्रचंड अवहेलना झालेली आहे. सदरमृत बंद्यास या सर्व नराधम रक्षकांनी उचलून पोलीस वाहनातून शासकीय रुग्णालयात पाठवून जसे काही घडलेच नाही असा बनाव करण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला जात आहे. सदर घटनेची संबंधित कारागृहातील कर्मचारी, रुग्णालयातील डॉक्टर,मयत बंद्याचे नातेवाईक प्रसारमाध्यमे या सर्वांवर संबंधित दोषी अधिकारी कर्मचारी हे प्रचंड राजकीय तसेच अन्य अवैध मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

तसेच प्रकरण दडपण्यासाठी मयत चिन्या जगतापच्या पत्नीला ५० हजार रुपये देवू करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला मात्र, त्याला विरोध केल्यामुळे संबंधित वरील सर्व संशयित माझ्यावर चिडलेली आहे. जेलर माळी हे स्थानिक असल्याने स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी संबंध असल्याने माझ्या कुटुंबाच्या जीवितास व नोकरीमध्ये धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर दोषी कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी, दोषी रक्षक अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत याच्यावर याप्रकरणी न्याय निर्णय होईपर्यंत अन्य ठिकाणी हलवावे व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशीही मागणी मनोज जाधव यांनी अर्जात केली आहे. या अर्जामुळे खळबळ माजली आहे.  तसेच शवविच्छेदन अहवालात देखील शरीरातील अंतर्गत रक्तस्रावामुळे मृत्यू झाला असे नमूद आहे. त्यामुळे मनोज जाधव यांच्या अर्जाला महत्व प्राप्त झाले आहे. याप्रकरणी न्यायालयीन चौकशी सुरु आहे.

 

 

 

 

 

Protected Content