ट्रक चालकाला मारहाण केल्याप्रकरणी आरटीओ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा

 

जळगाव प्रतिनिधी । ट्रक ओव्हरलोड असल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाने दंड भरण्यास नकार दिला असता, ट्रक चालकास आरटीओच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ट्रकचालकाच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात अधिकार्‍यासह कर्मचारी अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

छत्तीसगढ राज्यातील रहिवासी चालक विनोद मुकूंदलाल चौरे वय ३७ हे त्यांच्या ताब्यातील मालाने भरलेला ट्रक घेवून जळगावहून जात होते. १५ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास (एम.एच. ०४ के.आर. ६४१९) या शासकीय वाहनातून आलेल्या आरटीओ विभागाच्या अधिकार्‍यांसह दोन कर्मचारी अशा तिघांनी चौरे यांचा ट्रक महामार्गावर जळगाव शहरात अग्रवाल चौकात ऍक्सेस ब्रेन हॉस्पिटलच्या समोर अडविला. तसेच गाडी ओव्हरलोड असल्याचे सांगत तुला दंड भरावा लागेल, असे ट्रकचालक चौरे यांना अधिकार्‍यांनी सांगितले. गाडीचा वजनकाटा केला असून गाडी ओव्हरलोड नसल्याचे ट्रकचालक चौरे यांनी संबधित अधिकारी व कर्मचार्‍यांना सांगितले व दंड भरण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी चौरे यांच्या कानशिलात लगावली. तसेच लाकडी दांडक्याने मारहाण मारहाण केली. या मारहाणीत चालक चौरे यांच्या पायाचे हाड मोडले असून दुखापत झाली आहे. जखमी चालक विनोद चौरे यांनी दिलेल्या जबाबावरुन सोमवार, २२ नोव्हेंबर रोजी याप्रकरणी (एम.एच. ०४ के.आर. ६४१९) या आरटीओ विभागाच्या वाहनावरील अधिकारी तसेच कर्मचारी (नाव गाव माहित नाही) अशा तीन जणांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक विजय शिंदे हे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!