चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला वेग दिला असून चोपडा येथे प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले. या प्रशिक्षणातून सहभागी कर्मचाऱ्यांना जनगणनेची कार्यपद्धती, अचूक माहिती संकलन आणि जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
चोपडा येथील पंकज ग्लोबल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिरात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्याचे सत्र पार पडले. प्रशिक्षणादरम्यान प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा, याबाबत विविध उदाहरणे आणि उपक्रमांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे, खेळाच्या माध्यमातून परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याचे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात आला.

समारोप प्रसंगी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी उपस्थितांना संबोधित करताना शासनाच्या नियमांनुसार अचूक आणि पारदर्शक जनगणना करण्याचे आवाहन केले. जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, प्रत्येक प्रगणकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे त्यांनी सांगितले. तसेच केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे यांनीही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना कार्यातील बारकावे समजावून सांगितले.
या कार्यक्रमाला निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील, मंडळ अधिकारी मनोज साळुंखे, सहायक महसूल अधिकारी अरुण वसावे, नायब तहसीलदार पी. सी. धनगर, सहायक महसूल अधिकारी सुधीर गरुडकर, मंडळ अधिकारी रविंद्र माळी, मंडळ अधिकारी सुलेमान तडवी आणि सहायक शिक्षक दिनेश निघोट यांची उपस्थिती लाभली. प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाच्या विविध विभागांनी समन्वय साधत महत्त्वाची भूमिका बजावली.



