रावेर प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदार संघात मतदान पूर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहचत असून न्हावी येथे दोन दिवस कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या कर्मचारी अथवा अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी दिली. रावेर तहसील कार्यालयात आज सर्व क्षेत्रीय अधिकारी यांची महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली यात या प्रशिक्षण वर्गाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी सहा. निवडणूक अधिकारी अजित थोरबोले यांनी सांगितले की, न्हावी येथे जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय येथे वातानुकूलित सभागृहात आरामदायी बैठक व्यवस्थेत 30 आणि 31 मार्च रोजी सर्व क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पहिल्या दिवशी 1200 आणि दुसऱ्या दिवशी 1200 या प्रमाणे प्रशिक्षण होईल आणि एकाच दिवशी प्रत्येक कर्मचाऱ्यांना दोन सत्रात म्हणजेच सकाळी 9 ते 11 आणि 12 ते 2 मध्ये प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहेत या वेळी निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडगीलकर यांची प्रमुख उपस्थिती राहील. याच ठिकाणी 11 कक्षामध्ये प्रत्येकी 50 ते 55 कर्मचारी यांना 22 तज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षण देण्यासाठी तयार करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली बैठकीत तहसीलदार अभिलाषा देवगुणे, श्री कुवँर नायब तहसीलदार संजय तायडे, कविता देशमुख यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी, मंडलाधिकारी, तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते.
दांडी बहाद्दरांवर होणार कारवाई
लोकशाही पद्धतीत निवडणूक प्रक्रिया ही राष्ट्रीय हितासाठी पार पाडण्यात येते सर्व प्रशासकीय विभागांच्या सहकार्याने ही प्रक्रिया पार पाडण्यात येते. त्यामुळे या प्रक्रियेतील नियुक्त कर्मचारी प्रशिक्षण वर्गास येणे अपेक्षित आहे यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडते. परंतु या प्रक्रियेत गैर हजर राहून जाणीवपूर्वक दांडी मारणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट ईशारा सहा निवडणूक अधिकारी अजित थोरबोले यांनी दिला आहे.