जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दापोरा गावातील गिरणानदीपात्रातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली आहे. कारवाईत पोलिसांनी ट्रॉलीसह ट्रॅक्टर व दीड ब्रास वाळू जप्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गिरणा नदीपात्राातून वाळूचे उत्खनन करुन त्याची दापोरा ते शिरसोली रोडने अवैधपणे वाहतूक केली जात असल्याची माहिती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक गणेश सायकर, सहाय्यक फौजदार नितीन पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड, हरीलाल पाटील, संजय भालेराव तसेच चालक अशोक पाटील यांच्या पथकाने बुधवारी शिरसोलीरोडवर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. कर्मचारी ट्रॅक्टरमधील वाळूची तपासणी करत असतांना ट्रॅक्टरवरील तिघेही पसार झाले. कालु भिल रा शिरसोली व पारस संजय सोनवणे रा. जळगाव रविंद्र शिवाजी आटोळे रा.धानोरा अशी पसार झालेल्या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी ट्रॉलीसह ट्रॅक्टर तसेच ट्रॅक्टरमधील दीड ब्रास वाळू जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हरिलाल पाटील हे करीत आहेत.