मध्यरात्री अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले, प्रशासनाची धडाकेबाज कारवाई

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच तहसीलदार बंडू कापसे यांनी मध्यरात्री प्रत्यक्ष कारवाई करत अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले. ही धडक कारवाई रात्री तब्बल अडीच वाजता करण्यात आली असून त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

तहसीलदार बंडू कापसे यांच्याकडे रावेर परिसरात वाळू चोरीबाबत वारंवार तक्रारी येत होत्या. याची गांभीर्याने दखल घेत त्यांनी स्वतः गस्त घालण्याचा निर्णय घेतला. रेल्वे स्टेशन रोड ते विटवा रस्त्यावर गस्त घालत असताना MH-32-P-1708 क्रमांकाचे ट्रॅक्टर वाळूने भरलेले आढळले. वाहन थांबवून चौकशी केली असता चालक प्रदीप गोपाळ पाटील (रा. ऐनपूर) याच्याकडे कोणताही वैध वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर तहसीलदारांनी त्वरित कारवाई करत सदर ट्रॅक्टर ताब्यात घेतले व ते तहसील कार्यालयाच्या आवारात उभे केले. संबंधित ट्रॅक्टर मालकास दंडाची नोटीस देण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. तहसीलदार बंडू कापसे यांनी स्पष्ट केले की, अवैध वाळू वाहतुकीविरोधात प्रशासनाने शिथिलता दाखवली तर पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल, म्हणूनच अशा कारवायांचे सत्र सुरूच राहील.

दरम्यान, प्रशासनाच्या या कारवाईचे नागरिकांतून कौतुक होत असले तरी, स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकारी हे वाळू तस्करांवर लक्ष ठेवण्यात अपयशी ठरत असल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. परिणामी, पर्यावरणप्रेमींनी या निष्काळजी अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी केली आहे. तहसीलदार स्वतः मैदानात उतरल्यानंतरच कारवाई यशस्वी होत असल्याने, इतर अधिकारी नेमके काय करत आहेत, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Protected Content