टकाटक. . . टोयोटा इनोव्हा हायक्रॉस : जाणून घ्या सर्व फिचर्स !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वाणिज्य वृत्तसेवा | गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या इनोव्हा हायक्रॉस या मॉडेलचे आज अनावरण करण्यात आले असून यात एकापेक्षा एक अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने इनोव्हा या अतिशय लोकप्रिय मालिकेतील नवीन मॉडेलचे आज अनावरण केले आहे. इनोव्हा हायक्रॉस (याला इनोव्हा हाय या शॉर्ट नावाचे संबोधन आहे ! ) हे नवीन मॉडेल आज अधिकृतपणे लॉंच करण्यात आले असून यात जबरदस्त फिचर्स आहेत. खरं तर कंपनीने आधीच याचे टिझर्स जारी केले होते. यात यातील बर्‍याचशा फिचर्सची माहिती समोर आली होती. तथापि, आज याला अधिकृतपणे लॉंच करण्यात आल्याने या मॉडेलची इत्यंभूत माहिती जगाला मिळाली आहे. हे मॉडेल एमपीव्ही म्हणजेच मल्टीपर्पज व्हेईकल या प्रकारातील असले तरी याचा लूक हा एखाद्या एसयुव्ही सारखाच आहे. याची आसन क्षमता सहा इतकी आहे. तर हे मॉडेल दिसायला खूप आकर्षक असेच आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस या मॉडेलमध्ये सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असून यात सहा एयरबॅग्ज प्रदान करण्यात आल्या आहेत. याला पॅनोरॅमीक सनरूफ दिलेले असून ते या मॉडेलच्या आकर्षणात भर टाकणार आहे. यामध्ये एलईडी लँप्स दिले असून नवीन डिझाईनमधील बंपरदेखील दिलेले आहे. याचे व्हिल्स हे १८ इंच आकारमानाचे असणार आहेत. आतील बाजूचा विचार केला असता याला ड्युअल कलर टोनची सजावट केलेली आहे. याला अतिशय अद्ययावत असा डॅशबोर्ड दिलेला असून यात १० इंच आकारमानाच्या डिस्प्लेसह इन्फोटेनमेंट सिस्टीम प्रदान करण्यात आली आहे. यात ऍपल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटो या दोन्ही प्रणालींचा सपोर्ट आहे. याला ९ स्पीकरच्या अद्ययावत जेबीएल साऊंड सिस्टीमची जोड दिलेली आहे. तर दुसर्‍या रो मधील बसणार्‍या दोन सिटांच्या समोर देखील १० इंच आकारमानाचा डिजीटल डिस्प्ले लावलेला आहे. याला सनरूफ तसेच सर्व सीटांच्या जवळ एसी व्हेंट लावलेले आहेत. यामुळे यातील वातानुकुल प्रणालीचा सर्वांना उपयोग होणार आहे.

नवीन इनोव्हा हायक्रॉस या मॉडेलमध्ये सुरक्षाविषयक बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. यात पाचव्या पिढीतल्या सेफ्टी सेन्स प्रणालीचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. याच्या मदतीने रस्त्यावरील अडथळ्यांची चालकाला अचूक माहिती मिळणार आहे. यासोबत डायनॅमिक रडार क्रूझ कंट्रोल, ऑटो हाय बीम, ब्लाईंड स्पॉट मॉनिटर, इलेक्ट्रॉनिक पार्कींग ब्रेक आदी फिचर्सदेखील यात असतील.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस या मॉडेलमध्ये पेट्रोल आणि हायब्रीड इंजिनांचे पर्याय दिलेले असून या दोन्हीमध्ये ऍटोमॅटीक गिअर्स प्रणाली दिलेला आहे. या मध्ये २ लीटर क्षमतेचे हायब्रीड या प्रकारातील इंजिन आहे. अर्थात, हे मॉडेल पेट्रोल आणि इलेक्ट्रीक या दोन्ही घटकांवर चालणारे असेल. या टेक्नॉलॉजीमुळे या मॉडेलचे मायलेज देखील चांगले आहे. एक लीटर पेट्रोलमध्ये ही कार २१.१ किलोमीटर इतके अंतर धावणार असून एकदा पेट्रोलची टाकी फुल केल्यास तब्बल १०९७ किलोमीटर इतका प्रवास करणार असल्याचे आजच्या लॉंचींगच्या कार्यक्रमात सांगण्यात आले. याच पीकअप देखील जोरदार असून ० ते १०० किलोमीटरचा वेग हा अवघ्या ९.५ सेकंदात गाठता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस मॉडेलची बुकींग कंपनीच्या देशभरातील शो-रूम्समधून सुरू होणार आहे. तर आजच्या लॉंचींग कार्यक्रमात या मॉडेलच्या विविध व्हेरियंटचे मूल्य जाहीर करण्यात आलेले नाही. तथापि, तज्ज्ञांच्या मते फिचर्सचा विचार केला असता ही कार इनोव्हा क्रिस्टा पेक्षा महाग असेल. साधारणपणे जानेवारीच्या मध्यात हे मॉडेल ग्राहकांना प्रत्यक्षात खरेदी करता येणार आहे.

Protected Content