मुसळधार पाऊस… किर्रर्र रात्र…भीषण अपघात आणि माणुसकीचा आदर्श !

road accident

चाळीसगाव, दिलीप घोरपडे | येथून पंढरपूर येथे नियोजित मराठा क्रांती मोर्चा च्या बैठकीस जाण्यासाठी मंगळवारी (दि.८ ऑक्टोबर) बापूसाहेब शिरसाठ व आम्ही जात असतांना वाटेत रात्री ३:०० वाजता औरंगाबाद-अहमदनगर हायवेवर नगरच्या १२ किलोमीटर अलीकडे धनगरवाडीजवळ खोल नाल्यात एक अपघातग्रस्त कार दिसली त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. बहुतेक पावसामुळे किंवा झोपेची डुलकी लागल्यामुळे ती कार खोल नाल्यात झाडावर आदळली असेल, त्या गाडीत तीन जण होते. नवरा-बायको व पाच वर्षाचा मुलगा तो प्रसंग एवढा भीषण होता की, त्यावेळी गाडीत ड्रायव्हर असलेली ती व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध होती व ती महिला त्या धसक्याने सुन्न अवस्थेत बसली होती तर मुलगा मात्र जोरजोरात ओरडत होता, किंचाळत होता.

 

त्या वेळी त्याच्या आवाजाने रात्रीच्या शांततेत किर्रर्र अंधारात हृदय फाटेल एवढी भीषणता होती..आम्ही परिस्थिती चा अंदाज बघत प्रथम त्या वाहनापर्यंत गेलो व लॉक झालेली गाडीचे दरवाजे तोडून त्या तिघांना बाहेर काढले समोरील दृश्य बघून आम्ही देखील धास्तावलो गाडी चालवणारी व्यक्ती गंभीर जखमी होती तर त्या मुलाचा व त्याच्या आईचा हंबरडा जीवाची घालमेल करणारा होता. त्यावेळी त्या दोघांना बापूसाहेबांनी धीर दिला व आम्ही आहोत तुमच्यासोबत काळजी नका करू आम्ही बघतो, पुढे काय करता येईल ते, असे बोलून प्रथम शासकीय हेल्पलाईन १०८ अँबुलन्सला कॉल केला तेव्हा असे कळले की, अहमदनगरमध्ये १०८ हेल्पलाईन ची अँबुलन्स कार्यन्वित नाही मग अहमदनगर पोलीस स्टेशनला कॉल केला तर समोरील ठाणे अंमलदार म्हणाले की, ती आमची हद्द नाही आम्हाला कॉल करू नका. एम.आय. डी.सी. पोलीस स्टेशन कॉल करा, तेथेदेखील कॉल केला तर तेथील ठाणे अंमलदार म्हणाले की, प्रायव्हेट अँबुलन्स करा व जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करा, आम्ही सकाळी पंचनामा करू.

तोपर्यंत जखमी तरुणाचा खूप रक्तश्राव झाल्याने तो बेशुद्धावस्थेत होता. त्यास तात्काळ उपचाराची आवश्यकता होती, तेव्हा क्षणाचाही विलंब न करता बापूसाहेबांनी निर्णय घेतला की, आपल्या स्कॉर्पिओ गाडीत जखमी तरुणास व त्याच्या परिवारास घेऊन तत्काळ शासकीत दवाखान्यात उपचारासाठी घेऊन चला भर पावसात आमच्या सर्व संभाजी सैनिकांनी त्यांना गाडीत बसवून बाकी काही कार्यकर्ते गाडीला लटकून आम्ही निघालो. कारण गाडीत तेव्हा त्यांना घेतल्यामुळे जागाच शिल्लक नव्हती त्याही अवस्थेत कशाची पर्वा न करता गाडी सुसाट वाऱ्याच्या वेगाने शासकीय दवाखान्यात नेऊन जखमीला उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी तेथील डाँक्टरानी सांगितले की, पेशंटची अवस्था गंभीर आहे, तुम्ही तत्काळ प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये अँडमिट करा, तेव्हा पुन्हा बापूसाहेबांनी स्वखर्चाने प्रायव्हेट अँबुलन्सने पेशंटला अहमदनगर येथील विघनहर्ता हॉस्पीटलमध्ये दाखल केले आणि पुढील उपचार सुरू केले. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना सदरील घटनेची माहिती दिली व त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलला पोहचेपर्यंत आम्ही सर्व संभाजीसैनिक व बापूसाहेब शिरसाठ हॉस्पिटलमध्येच होतो.

जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, जखमी पेशंट आता धोक्याच्या बाहेर परंतु जर अजून फक्त १० मिनिटे लेट झाले असते तर परिस्तिथी गंभीर झाली असती. जखमींच्या उपस्थित नातेवाईकांनी बापूसाहेबांचे साश्रू नयनांनी आभार मानले…तेव्हा मात्र आम्हालाही आनंद झाला की, पंढरपूरला जात असताना वाटेतच आम्हाला विठ्ठल पावला. हा लेख लिहण्याचे एकच कारण की, अपघातग्रस्त जखमी रुग्णांची मृत्यूची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे व जास्त रुग्ण हे वेळेत उपचार न मिळाल्याने दगावतात..तरी सर्वाना विनंती की, आपल्या नजरेत जर एखादा अपघात झालेला असेल तर त्यास शक्य होईल, त्या वाहनाने लवकरात लवकर हॉस्पिटलला न्यावे, जेणेकरून त्यास वेळेत उपचार मिळतील. आता तर सुप्रीम कोर्टानेही आदेश दिले आहे की, अपघातात मदत करणाऱ्याची कुठलीही चौकशी होणार नाही, तरी माणुसकीच्या नात्याने शक्य होईल ती सगळी मदत करावी ही विनंती.

Protected Content