आज सर्व भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले – योगी आदित्यनाथ

अयोध्या-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन झालं. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितांना संबोधित केलं. आप सभी को कोटीकोटी बधाई…, असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. जगातील भारत हा केवळ एक असा देश आहे. जिथे देशातील बहुसंख्य असलेल्या समाजाने आपल्या आराध्य असलेल्या प्रभू राम यांच्या जन्मस्थानी मंदिर बनवण्यासाठी लढा दिला. तोही वेगवेगळ्या स्तरावर… संत, संन्यासी, पुजारी, राजकीय नेते, सामान्य लोकांनी यासाठी लढा दिला. शेवटी अखेर कोटी-कोटींची आस्था असलेल्या राम मंदिराचं उद्घाटन झालं, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

आपल्या सगळ्यांच्या त्यागाला आणि लढ्याला पूर्णता प्राप्त झाली आहे. आज आत्मा प्रफुल्लित आहे. कारण जिथं मंदिर बनवण्याची घोषणा होती. तिथेच मंदिर बनलं आहे. आज मन भावूक आहे. बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. संकल्प आणि साधनेच्या सिद्धीसाठी, संकल्पाच्या पूर्णतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार… , असं योगी आदित्यनाथ म्हणालेत.

2014 ला तुम्ही पंतप्रधान झालात तेव्हापासूनच जनतेला हे मंदिर होणार असा विश्वास होता. आता असं वाटतंय की, आपण त्रेतायुगात आलो आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या मनात राम आहे. भारतातील प्रत्येक शहर आज अयोध्या झालं आहे. प्रत्येक शहराचा रस्ता आज अयोध्येकडे येतोय. त्या शिल्पकाराचे आभार ज्यांनी आमच्या मनातील रामाची मूर्ती तयार केली, असंही योगी म्हणाले.

रामाचं जीवन आपल्याला संयम शिकवतो. त्याचमुळे आपला संकल्प दिवसेंदिवस दृढ होत गेला. आज आपलं स्वप्न पूर्ण झालं. संपूर्ण भारतात आज आनंदाचं वातावरण आहे. आमची पिढी भाग्यवान आहे. ज्यांनी राम मंदिर उभारताना पाहिलं. आज सर्व भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालं. आपण या सगळ्या कार्याचे साक्षीदार आहोत, असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

आज मला आपल्या संतांची आठवण होतेय. ज्यांनी राम मंदिरासाठी लढा दिला. ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो, असंही योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

Protected Content