जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सततची नापीकी आणि कर्जबाजाराला कंटाळून जळगाव तालुक्यातील भोकर येथील शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना सोमवारी ३१ मार्च रोजी दुपारी ४ वाजता समोर आली. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. लीलाधर जयराम पाटील (वय ५०, रा. भोकर ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील भोकर गावात लीलाधर पाटील हे आपल्या पत्नी, मुलगा, मुलगी आणि सुन यांच्या सोबत वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. सततची नापीकीमुळे ते कर्जबाजारी झाले होते. यामुळे ते काही दिवसांपासून विवंचनेत होते. याच विवंचनेतून सोमवारी ३१ मार्च रोजी दुपारी ४ वाजता ते घरी एकटे असतांना त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना खाली उतरवून तातडीने जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



