अयोध्या वृत्तसंस्था । श्रीराम मंदिराच्या आगामी भुमीपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमिवर अयोध्या येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून केंद्रीय यंत्रणांसह स्थानिक पोलीस सतर्कतेने पहारा देत आहेत.
अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्रीराम मंदिर भूमिपूजनाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. या सोहळ्यासाठी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. अयोध्या दौर्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी सुरक्षेचा प्रोटोकॉल फॉलो केला जाणार आहे. कोविड योद्धाही तिथे उपस्थित असणार आहेत. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास बंदी आहे. शहरातील दुकानं सुरु असतील. या कार्यक्रमाच्या प्रसंगी ड्रोनच्या माध्यमातून अवकाशातून नजर ठेवली जाणार आहे.
पोलीस प्रशासन ड्रोनच्या माध्यमातून व्हीआयपी मार्गांवर नजर ठेवणार आहोत. अयोध्येत राहत असलेल्या लोकांना शहरात फिरण्यावर बंदी नसेल. पण गरज नसल्याशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन लोकांना करण्यात आलं आहे. बाहेरील लोकांना शहरात प्रवेशबंदी असेल अशी माहिती अयोध्येचे उप महानिरीक्षक दीपक कुमार यांनी दिली आहे.