चंद्रपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सिंगापूरच्या धर्तीवर चंद्रपुरात टायगर सफारी सुरू करण्यात येणार आहे. यात पर्यटकांना ऑस्ट्रेलिया व न्युझीलंडचे प्राणी पाहायला मिळतील. चंद्रपुरात मूल मार्गावर सुरू होणाऱ्या या टायगर सफारी साठी प्राथमिक अभ्यास करण्याकरिता वनविभागाचे १५ अधिकारी नुकतेच सिंगापूर व दुबई दौऱ्यावर जाऊन आले आहे. या दौऱ्यात अधिकाऱ्यांनी प्राणिसंग्रहालय, पक्षी अभयारण्य, रात्र सफारी व शारजा सफारीचा अभ्यास केला.
अधिकाऱ्यांचे हे पथक लवकरच राज्य सरकारला याबाबत सविस्तर अहवाल सादर करणार आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर-मूल मार्गावरील वन अकादमी लगतच्या मोकळ्या जागेत टायगर सफारी सुरू करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. १५० ते २०० कोटींचा हा प्रकल्प आहे. या सफरीत पर्यटक पिंजऱ्यात तर त्यांच्या आजूबाजूला मोकळ्या वातावरणात वन्यजीव राहतील, असे नियोजन आहे. मार्च महिन्यात चंद्रपुरात झालेल्या ताडोबा महोत्सवात वनमंत्री मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली होती.