तहानलेल्या किनगावकरांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा; कार्यालयाची मोडतोड

4ac5b544 1a55 4efc a014 306d583eab3a

यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी आज (दि.८) मोर्चा काढुन ग्रामपंचायतीच्या कारभाराचे वाभाडे काढले. प्रचंड संतप्त ग्रामस्थांनी सरपंचाला धारेवर धरत ‘निर्लज्जम सदा सुखी; अशा सरपंचामुळे जनता दु:खी’ अशी घोषणाबाजी केली. यावेळी सरपंचाच्या राजीनाम्याची मागणीही संतप्त ग्रामस्थांनी केली.

 

अधिक माहिती अशी की, गावातील जनतेचा घसा कोरडा पडला तरी २१ दिवसांच्या प्रतिक्षेनंतरही पाणीपुरवठा न झाल्याने तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे प्रभाग क्रमांक ३ मधील ग्रामस्थांनी गावातून मोर्चा काढत ग्रामपंचायत कार्यालयाची तोडफोड केली. तसेच सरपंच टिकाराम चौधरी यांना शिवीगाळ करून पाणी देवु शकत नाही तर राजीनामा दे, असे बजावले. ग्रामस्थांच्या या संतापापुढे सरपंचाचाही थरकाप उडाला होता.

दिनांक ४ जून रोजी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन पाणी सुरळीत करण्याचे व कमीत कमी सहा दिवसाआड पाणी देण्याची मागणी केली होती. मात्र ग्रामपंचायतीने कोणतीही दखल न घेता निवेदनाची साधी चौकशीसुद्धा केली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांना आज नाईलाजास्तव मोर्चा काढावा लागला. किनगाव येथे पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यातच गावात सहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे, मात्र गावातील मुस्लिम बहूल भागात प्रभाग क्रमांक ३ मध्ये रमजान ईद सारखा सण असतांनाही या प्रभागात गेल्या २१ दिवसांपासुन पाणी आलेले नव्हते. तेव्हा सतंप्त झालेले या प्रभागातील लोकांनी सकाळी सरपंच टिकाराम चौधरी यांच्या घरासमोर नारळ फोडून तेथुन सवाद्य मोर्चा काढत थेट मुख्य चौकातील ग्रामपंचायत कार्यालय गाठले. तिथे घोषणाबाजी करीता संतप्त ग्रामस्थानी कार्यालयातील टेबल, खुर्च्यांची तोडफोड केली. सरपंच टिकाराम चौधरी यांच्यावर तोंडसुख घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली तर विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 3 मधून निवडून दिलेल्या सरपंच यांच्याच प्रभागात पाणी मिळत नाही, हे त्या ग्रामस्थांचे दुर्दैवचआहे. यावेळी सरपंच चौधरी यांनी तत्काळ आपल्या प्रभागाचा पाणी पुरवठा सुरळीत करून सर्वांना मुबलक पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन आंदोलकांना दिले.

Add Comment

Protected Content