Home उद्योग जैन इरिगेशनच्या तीन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत संधी ; भारताचे करतील प्रतिनिधित्व

जैन इरिगेशनच्या तीन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत संधी ; भारताचे करतील प्रतिनिधित्व

0
143

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जळगावच्या जैन इरिगेशन कंपनीच्या क्रीडाविभागाने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. कंपनीच्या तीन कॅरमपटूंनी भारताच्या आंतरराष्ट्रीय कॅरम संघात स्थान मिळवले असून, ते येत्या डिसेंबर महिन्यात मालदीव येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या घवघवीत यशामुळे कंपनीसह जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

२ ते ६ डिसेंबर २०२५ दरम्यान मालदीवमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी जैन इरिगेशनच्या संदीप दिवे, अभिजित त्रिपणकर आणि झैद फारुकी या तीन खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. या निवडीसाठी निकष म्हणून जानेवारी २०२५ मध्ये दिल्लीत झालेली राष्ट्रीय कॅरम अजिंक्यपद स्पर्धा आणि आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथे झालेल्या फेडरेशन कपमधील त्यांची कामगिरी पाहण्यात आली. या दोन्ही स्पर्धांमध्ये जैन इरिगेशनच्या पुरुष आणि महिला कॅरम संघांनी अंतिम विजेतेपद पटकावले होते.

जगभरातील सर्वोत्तम कॅरमपटूंना सामोरे जाण्याची संधी या स्पर्धेत मिळणार आहे. बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीवसह अमेरिका, युरोपियन संघ, ब्रिटन, स्वित्झर्लंड अशा देशांचे संघही यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत महत्त्वाची संधी मानली जात आहे.

या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, सय्यद मोहसीन यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे. यशस्वी प्रशिक्षण, नियमित सराव आणि क्रीडा संस्कृतीला दिलेले पाठबळ यामुळेच जैन इरिगेशनचे खेळाडू आज देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत, असे गौरवोद्गार यावेळी व्यक्त करण्यात आले.

जैन इरिगेशनच्या या खेळाडूंनी मिळवलेली निवड ही जळगावसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. देशाच्या झेंड्याला आंतरराष्ट्रीय मंचावर उंचावण्याची ही नामी संधी असून, त्यांच्याकडून आता पदकाचीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound