जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद रोडवरून दुचाकीने घरी येत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दांपत्यासह १७ वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना सोमवारी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. जखमी झालेल्या तिघांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा भागात राहणारे संतोष दगडू महाजन वय-४२ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने सोमवारी २५ नोव्हेंबर रोजी ते बाहेरगावी दुचाकीने गेलेले होते. आपले खाजगी काम आटपून ते पत्नी नलिनी संतोष महाजन वय-४० आणि मुलगा शुभम संतोष महाजन वय-१७ यांच्यासोबत दुचाकीने जळगाव शहरात येत असताना दुपारी ४ वाजता ममुराबाद रस्त्यावर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत संतोष महाजन यांच्यासह त्यांची पत्नी नलिनी महाजन व मुलगा शिवम महाजन हे जखमी झाले. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला. या घटनेबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.