जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शाहूनगर येथील बॉम्बे बिर्याणी दुकानासमोर जुन्या वादातून एकासह जावई आणि वहिनी अशा तिघांना दगड विटांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, शरीफ इमान खान वय 46 रा. शाहूनगर जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. मिस्तरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी 28 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता शरीफ खान हे त्यांचे जावई आणि वहिनी यांच्यासोबत शाहू नगरातील बॉम्बे बिर्याणीच्या दुकानासमोर उभे होते. त्यावेळी जुन्या भागातून संशयित आरोपी सल्या उर्फ सलाउद्दीन कुतुबुद्दीन शेख, करीम मुस्ताकीम खान, इम्रान मुस्ताक खान उर्फ मुल्ला तिघे रा. शाहूनगर या तिघांनी दगड विटा आणि लाकडी दांडक्याने शरीफ खान यांच्यासह त्यांचे जावई आणि वहिनी यांना बेदम मारहाण करून जखमी केले आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर शरीफ खान यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार मंगळवार 29 एप्रिल रोजी मध्यरात्री 1 वाजता मारहाण करणाऱ्या तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल ललित भदाणे करीत आहे.