भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात ठिकठिकाणच्या दुचाकी चोरी करून त्यांची विक्री करणार्या तीन अल्पवयीन आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग कृष्णांत पिंगळे यांनी भुसावळ उप विभागातील सातत्याने होत असलेल्या मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतीबंध करणे बाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन तसेच दुय्यम अधिकारी यांना वाहन चोरीचे रेकॉर्डवरील आरोपी तसेच वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देवुन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या.
या सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक मंगेश जाधव व ईतर पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करुन तपास सुरु केला. सदर तपास पथकामार्फत मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रयत्न चालु असतांना सदर पथकाला खात्रीशिर गोपनीय माहीती मिळाली की, मुक्ताईनगर तालुक्यातील संशयीत आरोपी हे चोरीतील मोटर सायकल घेवुन न्यु एरीया वार्ड भुसावळ या परिसरात मोटर सायकल चोरी करण्याचे उद्देशाने येणार आहेत.
या माहीतीच्या अनुषंगाने तपास पथकाने दिनांक २२/०५/२०२४ रोजी रात्री सापळा लावुन सदर संशयीत यास नंबरप्लेट नसलेल्या मोटर सायकलसह ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याचे कब्जात असलेली मोटर सायकल ही चोरीची असुन सदर बाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याची माहीती मिळाली.
या अनुषंगाने सदर गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता तो अल्पवयीन असल्याचे लक्षात आले व त्याने त्याचे इतर दोन अल्पवयीन साथीदारांसह एकुण ०८ मोटर सायकल या भुसावळ, जळगाव व मुक्ताई नगर या परिसरातुन चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर तपासादरम्यान वरील पोलीस पथकाने एकुण ०८ मोटर सायकल या हस्तगत केल्या आहेत. तसेच या अल्पवयीन मुलां मागे आणखी कोणी इसम हे चोरी करण्यात सहभागी आहे काय याबाबत अधीक तपास सुरु आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ कृष्णांत पिंगळे आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पो उप निरीक्षक मंगेश जाधव, नेरकर, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, योगेश माळी, पो जावेद शहा, पो श अमर अढाळे, पो प्रशांत लाड यांनी केली आहे.