भीषण आगीत तीन घर जळून खाक; दोन लाखांपर्यंतचे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील समतानगर भागातील वंजारी टेकडीवरील घरांना अचानक लागलेल्या आगीत पार्टीशनचे तीन घरं जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या आगीत सुदैवाने कोरणीही जिवीतहानी झाली नसली तरी तीन्ही घरांमधील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने रहिवाश्यांचा संसारच उघड्यावर आला आहे. एकूण दोन लाखांपर्यंतचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, समतानगर भागातील वंजारी टेकडी असून, या टेकडीवर अनेक पार्टीशनच्या घरं आहेत. याठिकाणी गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. स्थानिक रहिवाश्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वच घरं पार्टीशनची असल्याने आग आटोक्यात येऊ शकली नाही. या भागातील भुपेश कुलकर्णी यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर काही वेळातच अग्निशमन विभागाचे पथक दाखल झाले. एका बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत तीन पार्टीशनची घरं  व घरांमधील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. या आगीत रविंद्र चव्हाण, समाधान चव्हाण, धुडकु चव्हाण यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

Protected Content