भुसावळ प्रतिनिधी । स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तीन मोटारसायकल चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत माहिती अशी की, जामनेर शहरातील एक तरूण चोरीची दुचाकी वापरत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. यामुळे स्थागुशाचे निरिक्षक बापू रोहम यांनी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले आणि अप्पर अधिक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाला नियुक्त केले. यात सपोनि महेश जानकर, पोनि सुधाकर लहारे, हेकॉ शरीफ काझी, युनुस शेख, सुरज पाटील, प्रकाश महाजन, विकास वाघ, दादाभाऊ पाटील, योगेश वराडे, गफूर तडवी, इद्रीस पठाण आणि दर्शन ढाकणे यांचा समावेश होता. या पथकाने जामनेरच्या श्रीराम पेठेतील राकेश समाधान लोणारी (वय २१) याला ताब्यात घेतले. त्याने आपण वापरत असणारी दुचाकी ही चेतन ईश्वर संग्रामे (रा. जामनेर, ह.मु. शिरपूर) आणि सागर शिवराम शिरसाठ (रा. बिडकीन, ता. पैठण) या दोन मित्रांच्या सोबतीने चोरल्याची माहिती दिली. एवढेच नव्हे तर या तिघांनी एकूण चार मोटारसायकली चोरल्याची माहितीदेखील त्याने दिली. यानुसार चेतन संग्रामे आणि सागर शिरसाठ यांना अटक केली असून त्यांच्याकडून मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी जामनेर, शिरपूर आणि बिडकी येथील पोलीस स्थानकांमध्ये तीन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर या तिन्ही आरोपींनी चोरलेल्या चार होंडा शाईन या दुचाकी जामनेर पोलीस स्थानकात जमा करण्यात आल्या आहेत.