जळगाव महामार्गावरील ट्रकमधून तेल लंबविणाऱ्या तीन जणांना अटक

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात महामार्गावर धावणार्‍या तसेच थांबलेल्या वाहनांमधून माल लांबविणार्‍या गुजरातमधील टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक महिती अशी की, इद्रीस मोहम्मद कालू (38), मोहम्मद बशीर शेख (35) व शोएब हुसेन जभा (37) सर्व रा.गोध्रा, गुजरात या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अधिक माहिती अशी की, वरणगाव येथे नागपूर महामार्गावर खाद्य तेल भरलेला ट्रक (क्र.एम.एच.19सी.वाय.6002) लावण्यात आलेला होता. त्यात 7 लाख 37 हजार 345 रुपये किमतीचा तेलाचा साठा होता. 23 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी हा ट्रक चोरट्यांनी मध्यरात्री लांबविला होता. 

वरणगाव येथून ट्रक व तेल चोरणार्‍या संशयिताबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, सहायक फौजदार राजेंद्र  पाटील, अशरफ शेख, दादाभाऊ पाटील व दीपक पाटील यांचे पथक रविवारी सकाळी रवाना केले. वर्णन व गुप्त माहितीच्या आधारावर या पथकाने सापळा रचून इद्रीस मोहम्मद कालू, मोहम्मद बशीर शेख व शोएब हुसेन जभा या तिघांच्या मुसक्या आवळल्या.  पोलीसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी वरणगाव येथून ट्रक व तेल चोरल्याची कबुली दिली आहे. तिघांना पुढील कार्यवाहीसाठी वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरणगावचे सहायक निरीक्षक संदीपकुमार बोरसे करीत आहे.

 

Protected Content