जळगाव प्रतिनिधी । दोन्ही मुलांना शासकीय नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून ६० वर्षीय वयोवृध्दाला ३ लाख ६० हजाराचा चुना लावणाऱ्या डोंबिवली मुंबई येथील तरूणावर जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर निंबा पाटील (वय-६०) रा. डोणगाव ता. यावल जि.जळगाव हे शेती करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची मुंबई डोंबिवली येथील आप्पासाहेबर महादेव बजबळकर (वय-१७) यांच्याशी ओळख सन २०१७-१८ मध्ये झाली. ओळखीतून आप्पासाहेब बजबळकर यांनी ज्ञानेश्वर पाटील यांना त्यांच्या भुषण पाटील आणि उमेश पाटील या दोन्ही मुलाला शासकीय नोकरी दावून देतो असे सांगितले. दोन्ही मुलांना शासकीय नोकरी लागेल याचा विचार करून ज्ञानेश्वर पाटील यांनी सन २०१७ आणि २०१८ मध्ये वेळोवेळी शहरातील गांधी उद्यानाजवळी स्वातंत्र्य चौकात एकुण ३ लाख ६० हजार रूपये रोख दिले. आप्पासाहेब बजबळकर यांनी नोकरीचे कागदपत्र न देता फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. नोकरीसाठी दिलेले पैसे देण्याचे टाळाटाळ केली. याप्रकरणी ज्ञानेश्वर निंबा पाटील यांनी जिल्हा पेठ पोलीसात धाव घेतली. ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आप्पासाहेब महादेव बजबळकर याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहे.