राज्यातील हजारो शिक्षकांचा वरिष्ठ व निवडश्रेणीचा सुटणार प्रश्न

पारोळा प्रतिनिधी । राज्यातील हजारो शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आंदोलन करणारे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांच्या प्रयत्नांना यश आले असून शिक्षण विभागाकडून वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण सुरू करण्याबाबत तयारी सुरू झाल्याची माहिती भाजपा शिक्षक आघाडी जळगाव जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चौधरी यांनी दिली आहे.

राज्यातील हजारो शिक्षकांना मागील काही वर्षांपासून वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी पात्र असूनही प्रशिक्षण अभावी वेतनश्रेणी मिळत नव्हती याविरोधात भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी ५ सप्टेंबर रोजी पुणे येथील राज्य  शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 

याबाबत बोरनारे यांनी १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड तसेच विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना निवेदन पाठविले होते. आज याबाबत अनिल बोरनारे यांना राज्य  शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम डी सिंह यांनी पत्र पाठवून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. 

तसेच या पत्रात शासनाकडून प्रशिक्षण आयोजित करण्याची तयारी करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.  वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑनलाईन / ऑफलाईन अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय असे चार स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. 

सदरील समितीमध्ये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी उद्दिष्टे, विषयांची निश्चिती, घटकांची निश्चिती, वेळापत्रक तयार करणे, घटकांचे सादरीकरण करणे व त्याला अंतिम स्वरुप देण्याचे कामकाज सुरु आहे. कोव्हिड परिस्थितीत ऑनलाईन १० दिवसांच्या प्रशिक्षण आयोजनाची पूर्वतयारी परिषद स्तरावर सुरु करण्यात येत आहे असेही पत्रात म्हटले आहे.

आंदोलन करणारच- अनिल बोरनारे

शिक्षणक्षेत्रातील केवळ एक प्रश्न सुटला असून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, शिक्षणक्षेत्राला भ्रष्टाचाराची कीड लागली असून यामुळे राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक व पालक सर्वच भरडले जात असून याविरोधात आंदोलन करण्यावर अनिल बोरनारे ठाम असल्याचे जितेंद्र चौधरी यांनी सांगितले.

 

Protected Content