मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। बॉलिवूडमध्ये अनेक गाणी दशकांनंतरही लोकप्रिय राहिली आहेत, पण काही गाणी अशीही आहेत ज्यांनी केवळ लोकप्रियतेचा उच्चांक गाठला नाही, तर वादांच्या भोवऱ्यातही अडकली. असाच एक प्रसंग 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खलनायक’ या चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यामुळे घडला होता. हे गाणं प्रचंड गाजलं, मात्र त्याचवेळी देशभरात मोठा वाद निर्माण झाला. इतका की, दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओने या गाण्यावर थेट बंदीच घातली.
सुभाष घई दिग्दर्शित ‘खलनायक’ या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका होत्या. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. चार कोटींच्या बजेटवर बनलेला हा चित्रपट जवळपास 21 कोटींचा गल्ला जमवण्यात यशस्वी ठरला. मात्र, चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यामुळे निर्माण झालेला वाद चित्रपटाच्या यशाला काहीसा गडद करून गेला.

हे गाणं अलका याज्ञिक आणि इला अरुण यांनी गायले असून, लता मंगेशकरने त्यात गायन नाकारल्याचा किस्सा देखील तेव्हा चर्चेत आला होता. या गाण्याच्या बोलांवरून अनेक समाजघटकांनी आक्षेप घेतला. गाणं अश्लील असून महिलांचा अपमान करत असल्याचा आरोप करण्यात आला. देशभरात या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली. अनेकांनी सेन्सॉर बोर्डाकडे गाणं चित्रपटातून हटवण्याची मागणी केली. इतकेच नव्हे तर विक्रीस गेलेल्या ऑडिओ कॅसेट्स परत मागवाव्यात, अशी मागणीदेखील करण्यात आली.
वाद इतका वाढला की प्रकरण थेट न्यायालयात गेले. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला कोर्टात उपस्थित राहावं लागलं. पण कोर्टाने या गाण्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचं स्पष्ट करत प्रकरणाला पूर्णविराम दिला. मात्र तरीही, समाजातील काही गटांचा आक्रोश शांत झाला नाही. अशा वेळी, अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या समर्थनार्थ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समोर आले. त्यांनी ठामपणे म्हटलं की, “या गाण्यात काहीही अश्लील नाही, त्यामुळे विरोध करण्याचं कारणच नाही.”
या साऱ्या गदारोळानंतरही, दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओने मात्र हे गाणं आपल्या प्लॅटफॉर्मवरून दूरच ठेवलं. त्यावर बंदी कायम राहिली. त्यामुळे तेव्हा प्रचंड गाजलेलं हे गाणं टीव्ही किंवा रेडिओवर ऐकायला मिळणं जवळजवळ अशक्यच होतं. यामुळे गाण्याची लोकप्रियता असूनही त्याचा प्रसार काही प्रमाणात मर्यादित राहिला.



