Home क्राईम “‘परमात्म्याच्या आदेशानेच केलं’; सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरचं वादग्रस्त वक्तव्य”

“‘परमात्म्याच्या आदेशानेच केलं’; सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरचं वादग्रस्त वक्तव्य”

0
391


नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यवाहीदरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिल राकेश किशोर याने पुन्हा एकदा खळबळजनक विधान करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. “परमात्म्याने माझ्याकडून जे करवून घेतलं ते मी केलं. मला काहीच दु:ख नाही. मी माफी मागणार नाही,” असं धक्कादायक वक्तव्य करत राकेश किशोरने पुन्हा एकदा न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेवर सवाल निर्माण केला आहे.

घटनेनंतर सरन्यायाधीश गवई यांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल न करता त्याला माफ केलं होतं. परंतु राकेश किशोरच्या अशा कठोर आणि उर्मट प्रतिक्रियेमुळे या क्षमाशीलतेचा समाजात संमिश्र प्रतिसाद उमटला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी शिक्षित आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे, मी नशेत नव्हतो. पण जे काही केलं, ते संपूर्ण शुद्धीमध्ये केलं. माझ्यावर कोणतीही कारवाई झाली तरीही मला काही फरक पडणार नाही.”

या प्रकरणाची पार्श्वभूमी १६ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीशी संबंधित आहे. या याचिकेत मध्यप्रदेशातील खजुराहो येथे विष्णू मूर्तीच्या पुनर्बांधणीची मागणी करण्यात आली होती. मात्र सरन्यायाधीश गवई यांनी ती याचिका फेटाळून लावत, ती बाब भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) अधिकारक्षेत्रात येते, असे स्पष्ट केले. याच दरम्यान, त्यांनी “तुम्ही भगवान विष्णूला सांगितलं पाहिजे, त्यांनीच काहीतरी केलं पाहिजे,” असे विधान केले. या विधानावरूनच संतप्त झालेल्या राकेश किशोरने सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रकार केला.

याच दिवशी सर्वोच्च न्यायालयात त्याच्याजवळ एक कागद सापडला होता, ज्यावर लिहले होते, “माझा संदेश प्रत्येक सनातन्यासाठी आहे. हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.” या प्रकारानंतर तात्काळ सुरक्षा यंत्रणांनी त्याला अटक केली. नंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने त्याच्यावर कठोर कारवाई करत त्याची वकिलीची सनद रद्द केली.

विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकारात सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी अत्यंत संयम राखत, “कोणीही विचलित होऊ नये, मी स्वतःही झालो नाही,” असे म्हणत सुनावणी पूर्ववत सुरु ठेवली होती. न्यायालयाच्या कार्यवाहीत अशा प्रकारचा हल्ला होऊनही, सर्वोच्च न्यायालयाचा गंभीरपणा आणि स्थैर्य अबाधित राहिले.


Protected Content

Play sound