जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणावर यश मिळालेले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. यामध्ये जळगाव जिल्हयातून तीन आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. यामध्ये भाजपचे जामनेरचे आमदार गिरीश महाजन, शिवसेना शिंदे गटाचे जळगाव ग्रामीण आमदार गुलाबराव पाटील आणि भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या नावाचा समावेश आहे. अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. तसेच ते आज नागपूरात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारच्या शपथविधी सोहळ्यात राजभवनात शपथ असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
सातव्यांदा निवडून येणार गिरीश महाजन तिसऱ्यांदा बनणार मंत्री !
जामनेर मतदारसंघातून सलग सातव्यांदा गिरीश महाजन हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांनी पहिल्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांच्याकडे जलसंपदा हे खाते घेण्यात आलेले होते. २०१९च्या विधानसभेत निवडून आल्यानंतर महायुती सरकारच्या काळात गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी दुसऱ्यांदा मंत्रिपद भूषवित आरोग्य शिक्षण मंत्री याची धुरा सांभाळली. त्यानंतर त्यांच्याकडे ग्रामविकास मंत्रीपद देखील देण्यात आले. गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा सातव्यांदा विजय झालेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची निवड झाल्यानंतर नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत आहे. या मंत्रिमंडळात गिरीश महाजन यांना देखील कॅबिनेट मंत्री म्हणून आज तिसऱ्यादा शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.
भाजपचे आमदार संजय सावकारे यांची दुसऱ्यांदा मंत्रीपदासाठी वर्णी !
आमदार संजय सावकारे हे भुसावळ मतदार संघातून चौथ्यांदा निवडून आलेले आहेत. संजय सावकारे पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर २००९ साली निवडून आले होते. त्यावेळी त्यांना पहिल्यादाच मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळलेली होती. त्यानंतर २०१४ विधानसभा निवडणूकी पुर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला. आणि भाजपच्या चिन्हावर आमदार लढविली आणि जिंकली सुध्दा. त्यानंतर सातत्याने २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत ते आमदार म्हणून निवडून आले आहे. सलग चौथ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले आहे. भुसावळच्या इतिहासात सलग चौथ्यांदा निवडून येणारे संजय सावकारे हे पहिले आमदार आहेत.
गुलाबराव पाटील तिसऱ्यांदा घेणार मंत्रीपदाची शपथ !
आमदार गुलाबराव पाटील यांची मंत्रिमंडळात मंत्री पदासाठी तिसऱ्यांदा नाव समोर आलेले आहे. गुलाबराव पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या एरंडोल मतदारसंघातून 1999 मधून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2004 मध्ये एरंडोल मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा निवडून आले. त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांनी जळगाव ग्रामीण मधून 2009 निवडणूक लढवली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांनी त्यांना पराभूत केले होते. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडून येऊन तिसऱ्यांदा आमदार झाले. त्याच कार्यकाळात त्यांना राज्यमंत्री करण्यात येऊन सहकार खाते मिळाले होते. त्यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर 2019 मध्ये ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आणि पाणीपुरवठा खाते देखील त्यांच्याकडे सोपविण्यात आले. दरम्यान गेल्या महिन्यात झालेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले. सलग तिसऱ्यांदा आणि आमदार म्हणून पाचव्यांदा निवडून आलेले गुलाबराव पाटील हे आज नागपूर येथे मंत्रिमंडळाचे विस्तारात मंत्रीपद म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचे नाव देखील चर्चेत आहे. याची चर्चा सोशल मीडियावर सूरू आहे. मात्र याची कोणतीही विश्वसनीय माहिती अद्याप मिळालेली नाही.