रावेर प्रतिनिधी । केंद्र सरकारने कृषी संबंधात पारित केलेले तीन कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांचा एकजुटीचा आहे. पण हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केली. आज रावेर येथे सहकार पॅनलच्या मेळाव्याप्रसंगी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्युज’शी संवाद साधताना त्यांनी या संदर्भात भाष्य केले.
नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे केंद्र सरकारला कृषी कायदे रद्द करावे लागल्याची प्रतिक्रिया सुद्धा एकनाथराव खडसे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशालासंबोधित करत तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केल्यामुळे केंद्र सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागल्याची प्रतिक्रिया देशभरातून उमटत आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी रावेर येथील मेळाव्यात प्रसंगी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना याबाबत भाष्य केले. खडसे म्हणाले की, केंद्र सरकारने हा उशिरा का होईना पण शहाणपणाचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांवर अत्याचार करण्यात आले. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, त्यांच्यावरती लाठीमार करण्यात आला, यात अनेक शेतकऱ्यांना मरण आले. पण शेतकऱ्यांनी एकजूट दाखवल्यामुळे केंद्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. खरं तर हा निर्णय खूप उशिरा घेण्यात आलेला आहे हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका एकनाथराव खडसे यांनी केली.