मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज सुप्रीम कोर्टाने इतर मागासवर्ग समुहाच्या आरक्षणाबाबत दिलेला निर्णय स्वागतार्ह असून हा ओबीसींनी दिलेल्या लढ्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आज सायंकाळच्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत सविस्तर भाष्य केले आहे.
आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टात लागलेला निकाल हा खर्या अर्थाने ओबीसी समाजाच्या लढ्याचा विजय आहे. आम्ही आरक्षणाचा दिलेला शब्द पाळला आहे. बांठीया समाजाचा अहवाल हा अतिशय विस्तृतपणे सादर करण्यात आला असून न्यायालयात चांगली बाजू मांडण्यात आली. यामुळे ओबीसी समुदायाला पुन्हा एकदा आरक्षण मिळाला आहे. नगरविकास मंत्री म्हणून मी बांठिया आयोगाशी कायम संपर्कात होतो. आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही ज्या अडचणी असतील त्या दूर केल्या. यातून या लढ्यास यश प्राप्त झाले असल्याचे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आज न्यायालयात दुसर्या खटल्यात देखील आमची बाजू ही न्यायालयाने समजून घेतली आहे. आमच्याकडे बहुमत असून आम्ही दुसर्या कोणत्या पक्षात देखील गेलेलो नाही. यामुळे अनुच्छेद-१० मधील नियम आम्हाला लागू होत नसल्याची बाजू आमच्यातर्फे सुप्रीम कोर्टात मांडण्यात आली आहे.
तर विरोधकांनी केलेले कोणतेही आरोप कोर्टाने गांभीर्याने घेतली नसल्याचेही ते म्हणाले. १६ आमदारांच्या अपात्रतेवर सभापतींनी कोणताही निर्णय घेऊ नये असे कोर्टाने सांगितले असून हाच फक्त जैसे थे असा निर्णय आहे. याचा अपवाद वगळता आमची बाजू सक्षम असल्याचे आज दिसून आल्याने यात कोणताही संभ्रम नसल्याचे ते म्हणाले. तर लोकसभेत आता विनायक राऊत यांच्या ऐवजी राहूल शेवाळे हे गटनेते असून लोकसभा सभापतींनी याला मान्यता दिल्याचे ते म्हणाले. आमच्या सरकारसाठी हा शुभसंकेत असून मंत्रीमंडळाचा विस्तार देखील लवकरच करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.