गॅस सिलेंडर स्फोटातील जखमी तिसऱ्या रूग्णाचाही मृत्यू

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाहनामध्ये गॅस भरताना टाकीचा स्फोट होऊन गंभीररित्या जखमी झालेले वाहन चालक संदीप सोपान शेजवळ (४५,रा. वाघनगर) यांचा मुंबई येथे उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. यामुळे या दुर्घटनेत मृतांची संख्या तीन झाली आहे. सात जखमींवर पुणे तसेच जळगाव येथे उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात घरगुती गॅसचा वापर करून खासगी वाहनात भरत असतांना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होवून १० जण गंभीर जखमी झाले होते. यात रिफिलिंग सेंटर चालक दानिश शेख यांचा गुरुवारी ७ नोव्हेंबर रोजी रात्री मुंबई येथे तर शनिवार, ९ रोजी दुपारी भरत सोमनाथ दालवाले (५५,रा.जळगाव) यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला. तर स्फोटातील जखमी चालक संदीप शेजवळ यांना उपचारासाठी बुधवारी मुंबई येथे हलविण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना रविवारी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई तसेच भाऊ असा परिवार आहे.

Protected Content