जामनेर प्रतिनिधी | शहरामध्ये विविध ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पोलिसांनी सतर्क राहून रात्रीची गस्त वाढवावी व चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून घरफोड्या आणि जामनेर शहरातील नवीन बांधकाम चालू असलेल्या घर बांधकामवरवरील केबलसह अन्य साहित्याची चोरी होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांना लगाम घालावा अशी मागणी होत आहे.
जामनेर शहरांमध्ये दिनांक दि.८ डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी शहरात भुसावल रोदावरील सुशीला भारत गॅस एजन्सीमध्ये चोरी झाली असून यामध्ये साडेबारा हजाराचा मुद्देमाल गेला आहे. एक एलईडी सीसीटीव्ही मशीन व गॅस हंडी चोरट्यांनी चोरी केली असून याबाबत गॅस एजन्सी वॉचमन अशोक नानोटे राहणार मालदाभडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरीकडे गेल्या १५ दिवसापासून जामनेर शहरात नवीन बांधकाम चालू असलेल्या घरावरील कॉपर तार असलेल्या केबल मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे. त्याचबरोबर मेट्रो पोल, जागवार नळ डायमीटर व लोखंडी रॉड असे अनेक साहित्य चोरटे चोरी करीत असून गेल्या चार/पाच दिवसांमध्ये सुमारे दहा ते पंधरा चोरी चोरट्यांनी केली आहे. त्यामध्ये पुखराज जागी, राजेंद्र वानखेडे, शेगोभाई शीतल लोढा यांच्या घरातील साहित्य चोरट्यांनी चोरी केली.
दिनांक ८ रोजी सकाळच्या सुमारास रोहित बागमार यांच्या घरामध्ये एक अल्पवयीन अज्ञात चोरटा वायरची चोरी करत असताना सापडला असून नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र त्याच्याविरुद्ध जामनेर पोलिसात कोणती तक्रार दाखल झालेली नव्हती. अशाप्रकारे जामनेर शहरामध्ये विविध ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पोलिसांनी सतर्क राहून रात्रीची गस्त वाढवावी व चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जामनेर शहरवाशियाकडून होत आहे