जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक आवारात बसमध्ये चढत असतांना एका महिलेच्या गळ्यातून ४० हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र चोरून नेल्याची घटना मंगळवार २१ मे रोजी दुपारी १२.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्षा अतुल बारी वय २८ रा. शिवाजी चौक, रावेर या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार २१ मे रोजी दुपारी वर्षा बारी या महिला जळगाव बसस्थानकात आलेल्या होत्या. त्यावेळी दुपारी १२.३० वाजता पुणे – रावेर बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ४० हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र चोरून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर महिलेने बसमध्ये सर्व प्रवाशांकडून तपासणी केली. अखेर दुपारी ४ वाजता त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेश सोनवणे हे करीत आहे.