Home क्राईम चोरट्यांचा धुमाकूळ ; २७ हजारांच्या तांब्याच्या तारा लंपास

चोरट्यांचा धुमाकूळ ; २७ हजारांच्या तांब्याच्या तारा लंपास


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरालगत असलेल्या शिरसोली शिवारातील सज्जमशाहा महारी नायगाव परिसरातून अज्ञात चोरट्यांनी २७ हजार रुपये किमतीचे विद्युत साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली प्र.बो. येथील रहिवासी रघुनाथ विश्वनाथ बारी (वय ५२) यांची शिरसोली शिवारात शेती आहे. ३१ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी संगनमताने विद्युत वायर आणि सोलर प्लेटची चोरी केली. यामध्ये ९०० रुपये किमतीची १० फूट तांब्याची वायर, ९०० रुपये किमतीची सोलर प्लेटला जोडलेली १० फूट वायर आणि १८,००० रुपये किमतीची २०० फूट लांब तांब्याची वायर, अशा एकूण २७ हजार रुपये किमतीच्या मालाचा समावेश आहे.

आपल्या शेतातील विद्युत साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात येताच रघुनाथ बारी यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सफौ अधिकार पाटील करत आहेत.


Protected Content

Play sound