Home क्राईम चोरट्यांचे धाडस: सराफ दुकानाची भिंत फोडून ६ किलो चांदी व रोकड लंपास...

चोरट्यांचे धाडस: सराफ दुकानाची भिंत फोडून ६ किलो चांदी व रोकड लंपास !


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नामांकित घोडके ज्वेलर्स दुकानात थरारक चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या मागील भिंत फोडून तब्बल सहा किलो चांदी आणि रोख रक्कम लंपास केली. दोन दिवसांपासून बंद असलेल्या दुकानावर चोरट्यांनी डोळा ठेवत ही धाडसी चोरी केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवार, 18 मार्च 2025 रोजी सकाळी उघडकीस आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घोडके सराफ दुकानाचे मालक बाहेरगावी गेले होते. त्यामुळे दुकान दोन दिवसांपासून बंद होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सोमवारी १७ मार्च रोजी मध्यरात्री दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यांनी दुकानातील ६ किलो चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून पलायन केले. मंगळवारी १८ मार्च रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना भिंत फोडलेली दिसली आणि चोरीचा प्रकार समोर आला. त्यांनी तातडीने मालकाला आणि पोलिसांना माहिती दिली.

ही चोरी शहराच्या मुख्य रस्त्यावर घडली असून, पोलिसांच्या गस्तीला आव्हान देणारी ठरली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांचा धाकच उरला नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून भडगाव परिसरात गिरणा नदी पात्रातील वाळू उपसा आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांची निष्क्रियता चर्चेचा विषय ठरली आहे.

भडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी पंचनामा केला. चोरट्यांनी भिंत फोडण्यासाठी वापरलेली हत्यारे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, या धाडसी चोरीमुळे कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती पुन्हा एकदा प्रश्नचिन्हांकित झाली आहे.


Previous articleDating Advice for Slavic Brides
Next articleभडगावात जागतिक ग्राहक दिनानिमित्त पथनाट्य
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound