जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौफुलीजवळील एका दुकानाचे गोडावून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून ४५ हजार रूपये किंमतीच्या मुद्देमालाची लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषीकेश गंगाराम चौधरी (वय-३४) रा. दत्त मंदीरजवळ खडके चाळ, शिवाजी नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी शहरातील अजिंठा चौफुलीजवळील सपना हॉटेलच्या पाठीमागे एक गोडावून भाड्याने घेतले होते. गोडावूनमध्ये त्यांनी तंबाखूच्या गोण्या, जलजीरा पावड आणि मिस्क चहा पावडर असे आठ ते आठ पोती भरून ठेवलेल्या होत्या. नेहमीप्रमाणे १ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता त्यांनी दुकानाचे शटर बंद करून घरी गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शटर उचकावून गोडावूनमधील तंबाखूच्या गोण्या, जलजीरा पावड आणि मिस्क चहा पावडर असा ४५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे बुधवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला. त्यांनी ऋषीकेश चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. रात्री ९ वाजता ऋषीकेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मिलींद सोनवणे करीत आहे.