तीन वर्षांपासून फरार चोरट्याला अटक; एलसीबीची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील जगदीश बाळू शेळके (२३, रा. पथराड, ता. भडगाव) हा गावात येताच त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई रविवार, २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता भडगाव तालुक्यातील पथराड येथे करण्यात आली. अशी माहिती जिल्हा पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क अधिकारी विभागाने सायंकाळी ६ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील जगदीश शेळके हा तीन वर्षांपासून फरार होता. त्याच्या शोधार्थ चाळीसगाव शहर पोलीस पथक कामाला लागले होते. दरम्यान, फरार असलेला जगदीश शेळके हा भडगाव तालुक्यातील पथराड येथे आला असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. रविवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पथकातील पोउनि गणेश चौभे, विजयसिंग पाटील, लक्ष्मण पाटील, अक्रम शेख, किरण चौधरी, सुधाकर आंभोरे, पोकॉ राहुल पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी जगदीश बाळू शेळके याला अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content