जळगाव प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी क्रिडा संकुलातील चौधरी यात्रा कंपनीच्या कार्यालयासमोरुन उभी दुचाकी लांबविणार्या संशयित आरोपीला जिल्हापेठ पोलिसांनी नंदुरबार तालुका पोलिसांकडून सोमवारी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
श्रीकांत प्रकाश मोरे वय 24 अमळगाव ता. अमळनेर असे संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपीने शहरातील छत्रपती शिवाजी क्रिडा संकुल येथे चौधरी यात्रा कंपनीच्या कार्यालयात विनयकुमार अक्षयकुमार जोशी वय 56 रा. नेहरुनगर हे कामाला आहेत. 23 ऑक्टोंबर 2020 रोजी जोशी हे कार्यालयात आले. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी कार्यालयाच्या बाहेर स्टेडीयम कॉम्प्लेक्स आवारात पार्किंग केली. काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाले असता, त्यांची दुचाकी क्र. एम.एच. 15 बी.एच.4533 ही चोरट्याने चोरुन नेल्याचे समोर आले होते. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून आल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी जोशी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन दिवसांपूर्वी नंदुरबार पोलिसांनी जिल्हापेठ पोलिसांना संपर्क साधून तुमच्या हद्दीत चोरी झालेली दुचाकी जप्त केली असल्याचे सांगितले. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रविण भोसले, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय सोनार यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गाठून संशयित श्रीकांत मोरे यांच्यासह दुचाकी ताब्यात घेतली.
श्रीकांत मोरे याने दुचाकी चोरल्यानंतर नंदुरबारकडे येत असतांना दुचाकीचा कट मारण्यावरुन त्याचे ट्रकचालकाशी भांडण झाले होते. यावेळी पोलिसांनी भांडण सोडविले. मात्र भांडणानंतरही श्रीकांत याने ट्रकचालकाला पुढे चाल तुला बघून घेतो, अशी धमकी दिली होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून नंदुरबार तालुका पोलिसांनी श्रीकांत मोरे यास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी त्याच्याकडील दुचाकी चोरीचा असल्याचा भांडाफोड झाला होता. दरम्यान श्रीकांत यास अटक केल्यावर जिल्हापेठ पोलिसांनी सोमवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.