मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकार मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यास का घाबरत आहेत ? असा सवाल करतांनाच ‘ते‘ दोघे अख्ख्या महाराष्ट्राचे मालक बनल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलतांना राज्य सरकारच्या निर्णयांवर टीका केली. विशेष करून सरपंच व नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेतून घेण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला. ते म्हणाले की, “अशा निर्णयामुळे कधी कधी सरपंच एका विचाराचा आणि बॉडी दुसर्या विचाराची, त्यामुळे ग्रामीण भागात विकासात मोठ्या अडचणी येतात. तसंच शहरी भागातही नगरपालिका, नगर पंचायत आणि नगर परिषदेत या अडचणी येतात. आम्ही ही निवड पूर्वीसारखीच घेण्याचा निर्णय घेतला होता. आता या दोघांच्या मनात काय आलं आणि त्यांनी निर्णय घेतला.” वास्तविक तो लोकशाहीला मारक अशाप्रकारचा निर्णय असल्याचा आरोप त्यांनी केला.
अजित पवार पुढे म्हणाले की, “राज्यात सध्या आपत्तीची स्थिती आहे. अनेक ठिकाणी पूर आलेले असून दरडी कोसळल्या आहेत. मात्र पुनर्वसन विभागाला मंत्री आणि अधिकारी नाहीत.” इतके दिवस होऊन देखील मंत्रीमंडळ अस्तित्वात आलेले नाही; आणि हे दोघे अख्ख्या महाराष्ट्राचे मालक बनल्याची टीका त्यांनी केली.