राज्यातील रिक्षाचालकांसाठी सुरू होतील ‘या’ योजना

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रातील सुमारे नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या असंघटित क्षेत्रातील चालकांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी “धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ” स्थापन करण्यात आले आहे. या महामंडळाच्या पहिल्या बैठकीत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मंडळाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, हे महामंडळ महाराष्ट्रातील लाखो चालकांसाठी एक आदर्श संस्था म्हणून कार्य करेल.

२७ जानेवारी २०२५ रोजी, आदरणीय आनंद दिघे साहेब यांच्या जयंती दिनी या महामंडळाची अधिकृत स्थापना करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून या मंडळाची निर्मिती झाली आहे. राज्य शासनाने या महामंडळासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, भविष्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या मंडळाच्या माध्यमातून लाखो चालकांसाठी राबविल्या जातील, अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.

राज्यातील सर्व ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना या मंडळाचे सभासदत्व घेता येणार आहे. यासाठी नोंदणी शुल्क ५०० रुपये आणि वार्षिक वर्गणी ३०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. सभासद नोंदणीसाठी विशेष संकेतस्थळ तयार करण्यात आले असून, चालक स्वतःच्या मोबाईलवरूनही सहज नोंदणी करू शकतील.

महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ

महामंडळाच्या माध्यमातून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातील:
निवृत्ती सन्मान योजना – ६५ वर्षावरील सभासद चालकांना १०,००० रुपये सन्मान निधी दिला जाईल.
आरोग्य विमा योजना – सभासदांना जीवन विमा आणि अपंग विमा योजनांचा लाभ मिळणार आहे.
शिष्यवृत्ती योजना – चालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाणार आहे.
अपघात सहाय्य योजना – कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास चालकांना आर्थिक मदत दिली जाईल.
बक्षीस योजना – उत्कृष्ट रिक्षा/टॅक्सी चालक, संघटना आणि स्टँडसाठी दरवर्षी विशेष पुरस्कार योजना सुरू करण्यात येईल.

Protected Content