गुवाहाटी, वृत्तसंस्था | गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी येथील ईशान्य लोकशाही आघाडी (नॉर्थ-ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्स)च्या मेळाव्याप्रसंगी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीकास्र सोडले. काँग्रेसने कायमच ईशान्यच भारताला देशापासून वेगळे पाडले असल्याचा त्यांनी आरोप केला. तसेच, एनआरसीवरून बोलताना केवळ आसामच काय कुठल्याही राज्यात घुसखोरांना स्थान नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गृहमंत्री शाह यांनी म्हटले की, प्रत्येक राज्य हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ही भावना तळागळापर्यंत पोहचवण्यासाठी ईशान्य भारताला काँग्रेसमुक्त बनवणे महत्वाचे होते. आज मी हे आनंदाने सांगू शकतो की, ईशान्य भारतातील आठही राज्य ‘एनईडीए’बरोबर आहेत. काँग्रेसने ईशान्य भारतात कायमच फोडा आणि राज्य करा ही नीती अवंलबवली व संपूर्ण देशापासून ईशान्य भारतास वेगळे पाडले असल्याचा आरोपही गृहमंत्री शाह यांनी यावेळी केला.
‘एनआरसी’च्या मुद्द्यावरून बोलताना गृहमंत्री शाह म्हणाले की, ईशान्य भारतातील राज्यांनी एनआरसीवर चिंता व्यक्त केली आहे. कारण मोठ्याप्रमाणात नागरिक यातून वगळले गेले आहेत व अधिक गांभिर्याने यावर काम झाले पाहिजे असे सांगितले जात आहे. मात्र मी आश्वासन देतो की, एकही घुसखोर आसाममध्ये राहणार नाही व अन्य राज्यांमध्येही घुसखोरी करू शकणार नाही. आम्ही केवळ आसामला नाहीतर संपूर्ण देशालाच घुसखोरीपासून मुक्त बनवू इच्छित आहोत.
यावेळी त्यांनी कलम ३७१ ला केंद्र सरकार धक्का लावणार नसल्याचेही पुन्हा एकदा येथील लोकांना आश्वासन दिले. ते म्हणाले की, कलम ३७० मधील तरतुदी या तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या. तर कलम ३७१ ही विशेष तरतूद आहे. हा ईशान्य भारताचा अधिकार आहे याला कोणीही धक्का लावणार नाही.कलम ३७० आणि कलम ३७१ या दोन्हींमध्ये मोठा फरक असल्याचे शाह यांनी नमूद केले. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर कलम ३७१ बाबतही अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या या पार्श्वभूमीवर गृहमंत्री शाह यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी हे देखील म्हटले की, आज सीमेवर जी देशविरोधी कृत्य घडत आहेत, त्याविरोधात केंद्र सरकार कठोर पावलं उचलणार आहे. ड्रग्स, हत्यारांसह मानवी तस्करीविरोधात केंद्र सरकार अधिक कठोर होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.